दिवा: दिवा शहरातील प्रभाग क्रमांक २७ आणि २८ मधील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असून, या भागातील अस्वच्छता दूर करण्यासाठी महापालिकेने सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांनी केली आहे. दिवा शहरातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्ते दररोज पूर्णपणे स्वच्छ केले जात नसल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. विशेषतः अंतर्गत रस्त्यांच्या कडेला, फुटपाथवर आणि मोकळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील अंतर्गत सिमेंट काँक्रीटचे रस्ते आणि मुख्य रस्त्यांच्या कडेला असलेली मोकळी जागा दररोज सकाळी नीट साफ होणे गरजेचे आहे. मात्र, सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने स्वच्छतेचे काम रेंगाळत असल्याचे चित्र आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन महापालिका प्रशासनाने दिवा शहरासाठी जास्तीचे सफाई कामगार नियुक्त करावेत आणि दररोज सकाळी नियमाने रस्ते चकाचक करावेत, अशी आग्रही मागणी ज्योती पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे. स्वच्छतेच्या या मागणीमुळे आता तरी पालिकेला जाग येणार का, याकडे दिवावासियांचे लक्ष लागले आहे.






