शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भव्य रॅली काढून प्रचाराची सांगता
दिवा:दिवा शहराच्या स्वाभिमानासाठी, आरोग्य, शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा, ड्रेनेज समस्या आणि महिलांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी आवाज उठवणाऱ्या, तसेच विविध आंदोलनांच्या माध्यमातून जनप्रश्नांना वाचा फोडणाऱ्या ज्योती पाटील या प्रभाग क्रमांक २८ ‘ब’ मधून प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, येथील माता भगिनी व नागरिक त्यांच्या पाठी ठामपणे उभे राहतील असा विश्वास राजकांत पाटील यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचार रॅली संपल्यानंतर व्यक्त केला आहे.
मंगळवारी भव्य रॅली काढून ज्योती पाटील, त्यांचे सहकारी रोहिदास मुंडे आणि योगेश निकम यांनी आपल्या प्रचाराची सांगता केली. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता, दिव्यातील जनता एका अभ्यासू आणि कार्यक्षम नेतृत्वाच्या पाठीशी उभी असल्याचे चित्र पाहायला मिळाले. शिवसेनेचे तिन्ही उमेदवार या प्रभागातून मोठ्या मताधिक्याने विजय होतील असेही राजकांत पाटील म्हणाले.
प्रचारादरम्यान ज्योती पाटील यांनी मतदारांना काही महत्त्वपूर्ण आश्वासने दिली आहेत, ज्यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे:
आरोग्य सुविधा: निवडून आल्यानंतर पहिल्याच वर्षात दिवा शहरात सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याची गॅरंटी. यासाठी भाड्याने जागा उपलब्ध करून हॉस्पिटल सुरू करू असे त्यांनी म्हटले आहे.
पाणी प्रश्न: महिला भगिनींची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवून पहिल्या वर्षातच पाणी प्रश्नातून मुक्तता.
स्वच्छता व ड्रेनेज: शहराच्या आरोग्यासाठी घातक ठरणारी अस्वच्छता दूर करण्यासाठी ड्रेनेज यंत्रणा सक्षम करण्याचे आश्वासन.
सर्वांगीण विकास: सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी विविध शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प. शिक्षण,वाहतूक कोंडी, फेरीवाला धोरण, पार्किंग आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या आश्वासन त्यांनी दिले आहे, असे पाटील यावेळी बोलताना म्हणाले.
राजकांत पाटील यांनी संवाद साधताना सांगितले की, ज्योती पाटील या केवळ उमेदवार नसून त्या येथील महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या एक खंबीर नेत्या आहेत. त्यांच्या कामाची पद्धत आणि जनप्रश्नांची जाण यामुळे दिव्यातील जनता त्यांना नक्कीच कौल देईल. येणाऱ्या काळात ज्योती पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिवा शहराचा कायापालट झालेला पाहायला मिळेल.”
प्रचाराच्या सांगता रॅलीमध्ये मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक आणि महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या.






