नवीन जलवाहिन्या तातडीने कार्यान्वित करण्याचीही विनंती
दिवा:-दिवा शहराचे वेगाने वाढते नागरीकरण आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढलेल्या लोकसंख्येमुळे जीवनावश्यक सोयीसुविधांवर प्रचंड ताण येत आहे. विशेषतः, नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भाजपा महिला मोर्चाने पुढाकार घेतला आहे.
दिवा शहरातील नागरिकांना अतिरिक्त १० एमएलडी पाणी मिळावे, अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. सपना रोशन भगत यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सन्माननीय सौरभ राव यांच्याकडे केली आहे. बुधवारी आयुक्तांची भेट घेऊन त्यांनी यासंदर्भात एक निवेदन पत्र सादर केले.
दिवा शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, सध्याचा पाणीपुरवठा अपुरा पडत असून, नागरिकांना पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे सौ. भगत यांनी निवेदनात म्हटले आहे. यावर तातडीची उपाययोजना म्हणून शहराला अतिरिक्त १० एमएलडी पाणी मंजूर करण्यात यावे, अशी मुख्य मागणी त्यांनी केली.
तसेच, शहरात ज्या नवीन पाण्याच्या लाईन (जलवाहिन्या) टाकण्यात आल्या आहेत, त्यांचे तत्काळ वॉशआऊट करून त्या लवकरात लवकर कार्यान्वित कराव्यात, जेणेकरून पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल, अशी दुसरी महत्त्वाची मागणीही यावेळी करण्यात आली.
हे निवेदन पत्र देते वेळी ठाणे भाजपा माजी जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले साहेब, दिवा भाजपा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, ठाणे जिल्हा भाजपा कार्यकारणी सदस्य रोशन भगत, दुर्गेश मढवी यांच्यासह अन्य भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.






