दिवा:कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील दिवा-साबेगाव येथील प्रभाग क्रमांक २९ मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी आमदार सुभाष भोईर यांनी मैदानात उतरत जोरदार प्रचार केला. यावेळी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनीही या प्रचारात विशेष सहभाग नोंदवला. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी एकत्रितपणे केलेल्या या शक्तीप्रदर्शनामुळे साबेगाव परिसरात महायुतीचे मोठे वर्चस्व दिसून आले.
प्रचारादरम्यान संवाद साधताना शिवसेनेच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी विकासाच्या मुद्द्यावर भर दिला. त्या म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा शहराचा सर्वांगीण विकास होत आहे. विशेषतः साबेगाव आणि साळवी नगर या भागात येणाऱ्या काळात अधिक उत्तम नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या भागात जो काही विकास झाला आहे, तो केवळ शिवसेनेच्या माध्यमातूनच झाला आहे, असेही अर्चना पाटील यांनी यावेळी ठामपणे सांगितले. या प्रचार फेरीत महायुतीचे तिन्ही उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






