दिवा:– मागील काही दिवसांपासून दिवा शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून एकाच रात्रीत चोरट्यांनी सात घरात चोरी केल्याचे समोर आले आहे. चोरीच्या घटना वाढू लागल्याने दिव्यात पोलिसांची गस्त वाढवावी अशी आता मागणी होऊ लागली आहे.
दिवा शहरातील ग्लोबल शाळेच्या परिसरात एकाच दिवशी रात्रीच्या वेळेस चोरट्याने तब्बल सात घरात चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.चोरी केलेल्या घरातून सोने-चांदी, रोख रक्कम आणि दहा मोबाईल फोन घेऊन चोरट्याने पोबारा केला आहे. चोरीच्या एका घटनेत चोरटा हाती लागण्यापूर्वीच किचन खिडकीच्या वाटे पळून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
दिवा,पूर्व परिसरातील स्वामी समर्थ अपार्टमेंटमधील भावेश दैत यांनी दिलेल्या तक्रारीत, ते रविवारी (ता.२९) रात्री १ वाजण्याच्या सुमारास राहत्या घराचा दरवाजा बंद करून कुटुंबासह झोपी गेले. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची पत्नी अचानक ओरडली. त्यावेळी त्यांनी पत्नीला काय झाले असे विचारले,तोच त्याच्या घराच्या किचनच्या खिडकीचा आवाज आला. या आवाजाने उठून त्यांनी लाईट लावताच, एक अनोळखी २० ते २५ वर्षीय तरुण त्यांच्या घराच्या खिडकीतून पळून जात असताना दिसला. दरम्यान घरात पाहणी केली असता, त्या चोट्याने त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्रासह घरातील सोने-चांदीचे दागिने, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा ८८ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला आहे. दरम्यान त्याच परिसरातील एकविरा अपार्टमेंट मधील सहा घरात चोरट्याने घरातील मंडळी झोपी गेले असताना घरात शिरकाव करून चोरी केली. त्या घटनेत दीपाली सिंग, प्रवीण हरावडे, सुशांत करवळ, सुजल मोहिते, दिलीप सावंत आणि तुलु पारूल शेख याच्या घरातून मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा सात घरातून एकूण १ लाख ७८ हजारांचा ऐवज चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिस तपास करत आहेत.






