Homeठाणे-मेट्रोदिव्यात रामदास कदमांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून निषेध

दिव्यात रामदास कदमांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून निषेध

दिवा:-शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनावरून केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद दिव्यात उमटले. कदम यांनी बाळासाहेबांच्या निधनाचे गलिच्छ राजकारण सुरू केल्याचा आरोप करत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संतप्त शिवसैनिकांनी शहर प्रमुख सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली रामदास कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त केला.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी आणि शिवसैनिकांनी एकत्र येत रामदास कदम यांचा ‘बामदास’ असा उपहासात्मक उल्लेख केला. तसेच, ‘झेंडू बाम’चे फलक झळकावत अनोखे आंदोलन केले. या आंदोलनामुळे परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
या प्रसंगी बोलताना ठाकरेंच्या पक्षाचे शिवसेना शहर प्रमुख सचिन पाटील यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली. “बाळासाहेबांच्या नावावर राजकारण करणारे कदम आता त्यांच्या निधनाचेही राजकारण करून आपली राजकीय पोळी भाजत आहेत.ज्या ताटात खाल्ल त्यांनाच हे गद्दार विसरले ,” असे पाटील म्हणाले.
दिवा शहर महिला आघाडीच्या संघटिका ज्योती पाटील यांनी या गलिच्छ राजकारणाचा निषेध करत रामदास कदम यांच्या फोटोला जोडे मारले. “ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला ओळख दिली, त्यांच्याबद्दल असे वक्तव्य करताना कदमांना लाज वाटली पाहिजे,” अशा तीव्र शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या आंदोलनामुळे दिव्यातील ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचै शहर प्रमुख सचिन पाटील, उपजिल्हा संघटिका अंकिता पाटील, विधानसभा संघटिका योगिता नाईक ,शहर संघटिका ज्योती पाटील ,शहर समन्वयक प्रियंका सावंत, उपशहर संघटिका स्मिता जाधव, विभाग प्रमुख चेतन पाटील, राजेश भोईर, हेमंत नाईक, योगेश निकम ,संजय जाधव, रवी रसाळ, विभाग संघटिका प्रिया भोईर, सुहासिनी गुळेकर, वुषाळी साळुंखे, युवा सेनेचे सुयोग राणे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!