Homeठाणे-मेट्रोपरवानगी होती १५० ची भरल्या होत्या एकामध्ये २३४ तर दुसऱ्या ट्रकमध्ये १७६...

परवानगी होती १५० ची भरल्या होत्या एकामध्ये २३४ तर दुसऱ्या ट्रकमध्ये १७६ बकऱ्या- मेंढ्या

ठाणे पोलिसांची कारवाई दोन चालकांना अटक

दोन बकऱ्यांचा मृत्यू

ठाणे :- एका ट्रकमधून १५० बकऱ्या किंवा मेंढ्याच्या वाहतुकीची परवानगी असताना, ठाण्यातून मुंबईकडे निघालेल्या एका ट्रकमधून १७६ तर दुसऱ्या ट्रकमध्ये २३४ बकऱ्या आणि मेंढ्यांची वाहतुक केली जात होते. ते दोन्ही ट्रक ठाणे शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. याचदरम्यान या दाटीवाटीत दोन बकऱ्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कासारवडवली गुन्हा दाखल झाल्यानंतर गुजरात मधील ट्रकचालक हम्तीयाज अब्दुल मुलतानी (४७) आणि मुलतानी शरिफ गफुर (३१) या दोघांना अटक करत त्या दोन ट्रकसह मेंढ्या आणि बकऱ्या असा २० लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर, त्या मृत बकऱ्यांचे शवविच्छेदन करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शुक्रवारी सकाळी दोन ट्रकमधून मेंढ्या आणि बकऱ्यांची वाहतूक करीत होते. या गाड्यांमध्ये बकऱ्या आणि मेंढ्यांनी परवानगीपेक्षा जास्त भरल्या होत्या. हा ट्रक घोडबंदर मार्गे जात असताना राहुल पाचपुते या नागरिकाने पाहून ते दोन्ही ट्रक रोखून धरले. प्राणीप्रेमी मित्र संस्था आणि पोलिसांना घटनास्थळी बोलावून घेतले आणि त्यानंतर पोलिसांनी दोन्ही ट्रक कासारवडवली पोलिस ठाण्यात नेले. तिथे पोलिसांनी दोन्ही ट्रक चालकांकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी गुजरात येथून मुंबईतील देवनार कत्तलखाना येथे बकऱ्या घेऊन जात असल्याची माहिती दिली. पोलिसांनी या दोघांकडे बकरे वाहतूक परवान्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी परवाने दाखविले. यानुसार, एका ट्रकमधून १५० मेंढ्या, बकरे वाहतूकीस परवानगी होती. मात्र, कांदिवली येथील रघुवीर मानवता चॅरिटेबल ट्रस्ट ॲनिमल वेल्फेअर ऑर्गनयझेशन संस्थेच्या जुई कुडतरकर आणि पोलिसांना संशय आल्याने त्यांनी ट्रकची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पोलिसांनी ठाणे जिल्हा परिषदेचे पशुवैद्यकीय अधिकारी विवेक जाधव यांना बोलावून घेतले आणि ट्रकमधील बकऱ्यांची मोजणी करण्याबरोबरच त्यांची तपासणी सुरू केली. त्यावेळी एका ट्रकमध्ये २३४ बकऱ्या आणि मेंढ्या दाटीवाडीने भरलेल्या आढळून आल्या आणि त्यातील दोन बकऱ्यांचा मृत्यु झाल्याचे समोर आले. तर, दुसऱ्या ट्रकमध्ये १७८ बकऱ्या आणि मेंढ्या आढळून आल्या. अशाप्रकारे ४१२ मेंढ्या आणि बकऱ्या त्या दोन ट्रक भरण्यात आल्या होत्या. परवानगी पेक्षा जास्त बकऱ्या भरून त्यांना पुरेशी हवा, हालचाल करण्यास जागा नव्हती. त्यांना चारापाणी, औषधांची व्यवस्था करण्याऐवजी क्रुर वागणुक दिली. याप्रकरणी जुई कुडतरकर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कासारवडवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही ट्रक चालकांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

error: Content is protected !!