ठाणे: – “पात्रता नसलेल्या आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांना सामोरे जाणाऱ्या शंकर पाटोळे यांना ठाणे महापालिकेत उपायुक्तपदी बसवणे म्हणजे ठाणेकर जनतेच्या विश्वासाशी केलेला विश्वासघात आहे. आयुक्तांनी राजकीय दबावाखाली घेतलेला हा निर्णय महापालिकेच्या प्रतिमेवर काळा डाग आहे,” असा स्फोटक आरोप ठाणे शहर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केला.
काँग्रेसने केलेल्या खुलाशानुसार, 2004 मध्ये उप समाजविकास अधिकारी म्हणून लागलेले पाटोळे, 2010 मध्ये समाजविकास अधिकारी झाले. त्यानंतर सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार म्हणून संवेदनशील प्रभाग समित्यांमध्ये काम करत त्यांनी पूर्ण वेळ सहाय्यक आयुक्त पदाच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला.सहाय्यक आयुक्त पदावरील नियुक्तीस मान्यता मिळण्याबाबतच्या पालिकेच्या पत्राच्या अनुषंगाने शासनाने माहिती सादर करण्यास सांगितले असता प्रस्तावात नमूद केलेल्या अधिकाऱ्यांचे विभागीय चौकशी चालू अथवा प्रस्तावित नसल्याचा प्रथम अहवाल महापालिकेने दिला आणि याबाबतच्या दुसऱ्या अहवालात मात्र शंकर पाटोळे यांचेबाबत बीएसयुपी अनियमितता, अँटी करप्शन ब्युरोतील तक्रार, अनधिकृत बांधकामांना दिलेले संरक्षण, तसेच नागरिकांकडून आलेल्या तक्रारी प्रलंबित असल्या बाबत सदर केले.परंतु शासनाने आजवर पाटोळे यांच्या सहाय्यक आयुक्त पदालाच मान्यता दिलेली नाही, हे धक्कादायक वास्तव असून, अशा स्थितीत त्यांची पदोन्नती ही पूर्णपणे बोगस व बेकायदेशीर असल्याचा काँग्रेसचा दावा आहे.
याचबरोबर, पाटोळे यांची 2018 ते 2021 कालावधीत झालेल्या अनधिकृत बांधकामाबाबत चौकशी चालू असताना व सहाय्यक आयुक्त पदाची शासन मान्यता नसताना उपायुक्तपदी नेमल्याने महापालिकेच्या कारभारातील ‘भ्रष्टाचाराचा गड’ उघड झाल्याचे पिंगळे म्हणाले.
“आम्ही अनेकदा पुराव्यानिशी आयुक्तांकडे तक्रारी दाखल केल्या. तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनीसुद्धा या अधिकाऱ्याची कारकीर्द भ्रष्टाचाराने बरबटलेली असल्याचे लेखी पत्राद्वारे स्पष्ट केले. पण तरीही या अधिकाऱ्याला राजकीय आशीर्वादाने अभय देण्यात आले. ठाणेकरांची ही थेट फसवणूक आहे,” असा थेट आरोप काँग्रेसने केला.
पुढे बोलताना पिंगळे म्हणाले की, “आम्ही आता सार्वजनिक बांधकाम,स्थावर मालमत्ता, घनकचरा व शहर विकास विभागातील भ्रष्टाचाराचे पुरावे जनतेसमोर आणणार आहोत. आयुक्तांनी राजकीय दबावाला बळी न पडता कारवाईची भूमिका घेतली नाही, तर काँग्रेस रस्त्यावर उतरून ठाणेकरांसाठी लढेल.”
दरम्यान, न्यायालयीन चौकशी सुरू होताच, शंकर पाटोळे यांच्या ‘गेम ओव्हर’ची चर्चा ठाण्यातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ठाणेकर नागरिकांचा सवाल आता एकच “भ्रष्टाचाराला अभय देणाऱ्या ‘सूत्रधारां’वरही कारवाई होणार का ?”