Homeठाणे-मेट्रोप्रदूषणाविरोधात लढणारा दिवा प्रदूषण मुक्त दिवाळीचा संकल्प करेल काय ?

प्रदूषणाविरोधात लढणारा दिवा प्रदूषण मुक्त दिवाळीचा संकल्प करेल काय ?

सुहास खंडागळे

दिव्यातील नागरिकांनी खरोखरच प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प करावा का? हा प्रश्न केवळ एका सणापुरता मर्यादित नसून, दिवा शहराच्या एकूण आरोग्य आणि पर्यावरणाच्या जाणिवेवर बोट ठेवणारा आहे. एका बाजूला मागील काही वर्षे डंपिंगमुळे होणाऱ्या धुळीचे आणि धुराचे प्रदूषण, ज्याबद्दल राजकीय-सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक वारंवार नाराजी व्यक्त करतात, तर दुसऱ्या बाजूला दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या नावाखाली इमारतीच्या पॅसेजमध्ये किंवा जिन्यांमध्ये फटाके फोडून स्वतःहून प्रदूषण वाढेल अशी कृती करतात.हा विरोधाभास केवळ एक विसंगती नसून, दिवा शहरातील नागरिकांच्या आरोग्यविषयक जाणिवांची कसोटी आहे.

डंपिंगमुळे होणारे प्रदूषण लक्षात घेऊन येथील राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते, नागरिक यांनी अनेक आंदोलने केली.डम्पिंगची धूळ दिव्यातील नागरिकांसाठी वर्षभराची समस्या आहे. यावर टीका करणे, प्रशासनाला जाब विचारणे हे नागरिकांचे कर्तव्यच आहे. मात्र, जेव्हा नागरिक स्वतःच दिवाळीत इमारती मधील घराच्या बाहेर, जिन्यात आणि इमारतीच्या बंदिस्त भागात फटाके फोडून प्रदूषणाच्या या चक्रात भर घालतात, तेव्हा त्यांच्या टीकेतील प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उभे राहते.

जिन्यांमध्ये किंवा पॅसेजमध्ये लावलेल्या फटाक्यांचा धूर बाहेर न जाता इमारतीमध्येच बराच काळ रेंगाळतो. याचा थेट परिणाम इमारतीत राहणाऱ्या प्रत्येकाच्या श्वसनमार्गावर होतो. लहान मुले, वृद्ध, आणि श्वसनाचे आजार असलेल्या नागरिकांसाठी हा धूर अत्यंत घातक ठरू शकतो.
विशेषतः दिवा शहरात अनेक इमारती दाटीवाटीने वसलेल्या आहेत. दोन इमारती लागून असल्या सारखी स्थिती अनेक ठिकाणी आहे.अनेक इमारतींमध्ये हवा खेळती राहण्यासाठी पुरेशी व्हेंटिलेशनची सोय नाही. काही ठिकाणी तर व्हेंटिलेशन नाहीच.इमारतीच्या खाली मोकळी जागाही उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत, फटाक्यांमुळे निर्माण होणारे विषारी वायू आणि धूर नागरिकांच्या आरोग्यासाठी ‘आत्मघातकी’ ठरू शकतो.

एका बाजूला महापालिका प्रशासनावर आरोग्य दुर्लक्ष केल्याचा आरोप करायचा आणि दुसऱ्या बाजूला आपण स्वतःच सणाच्या नावाखाली स्वतःच्या आरोग्याशी खेळायचे, हा काय प्रकार आहे ?

दिवाळी हा मूळात ‘दिपोत्सव’ आहे, प्रकाशाचा सण आहे. या सणाचा खरा आनंद दिव्यांची रोषणाई, आकर्षक रांगोळ्या, गोडधोड पदार्थ, आणि आपुलकीच्या भेटीगाठींमध्ये आहे. फटाके हा केवळ एक जोडलेला भाग आहे. सण साजरा करायचा आहे, म्हणून फटाके फोडलेच पाहिजेत, असा कोणताही नियम नाही. यापूर्वीही अनेक पिढ्यांनी फटाक्यांशिवाय किंवा अत्यंत कमी प्रमाणात फटाके वापरून दिवाळी साजरी केली आहे.
फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण पर्यावरणासाठी तर हानिकारक आहेच, पण ते आपल्या भावी पिढ्यांच्या आरोग्याची किंमत देऊन साजरा करणे कितपत योग्य आहे? दिवा शहरातील नागरिकांनी यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. एखादी दुर्घटना दुर्दैवाने घडली तर अग्निशमन दलाच्या गाड्या दाटीवाटीने असलेल्या इमारती पर्यंत पोहचतीलच अशी स्थिती नाही.आपल्याकडे फटाके फोडण्यासाठी मुंबई-पुण्यासारखी मोठी मैदाने किंवा मोकळ्या जागा उपलब्ध नाहीत. त्यामुळे, ‘प्रदूषणमुक्त दिवाळी’चा संकल्प करणे ही वेळेची गरज आहे.

दिव्यातील नागरिकांनी स्वतःला काही बंधने घालून घ्यायला हवीत. फटाक्यांवर होणारा खर्च आरोग्यदायी उपक्रम किंवा गरजूंना मदत करण्यासाठी वापरता येऊ शकतो. प्रदूषणमुक्तीची सुरुवात आपल्या घरापासून आणि इमारतीपासून करायला हवी. प्रत्येक इमारतीच्या मंडळाने इमारतीमध्ये फटाके फोडण्यास मनाई करायला हवी.जिना किंवा पॅसेज मध्ये फटाके फोडायचे नाहीत हे ठरवायला हवे.काहीतरी शिस्त आपण स्वतःहून लावून घ्यायला हवी.जर दिव्यातील नागरिकांनी डंपिंगच्या प्रदूषणावर आवाज उठवला आहे, तर त्यांनी फटाक्यांच्या प्रदूषणालाही तितक्याच ताकदीने ‘नकार’ द्यायला हवा.

प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प करून दिवा शहर इतर शहरांसाठी एक आदर्श नक्कीच निर्माण करू शकते.आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे, आणि सणाच्या नावाखाली या संपत्तीशी खेळणे शहाणपणाचे नाही. दिव्यातील नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची आणि शहराच्या पर्यावरणाची जबाबदारी घेऊन फटाक्यांशिवाय दिव्यांच्या प्रकाशात खरी दिवाळी साजरी करावी, अशी अपेक्षा आहे. हा विरोधभास दूर करण्याची शक्ती आणि विवेक दिव्यातील नागरिकांमध्ये आहे, फक्त त्यांना त्याची जाणीव होण्याची गरज आहे.

error: Content is protected !!