घेतली मुख्यमंत्र्यांची ठाण्यात भेट; मुहूर्त साधला नवरात्रीचा
ठाणे : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दोन सेवेकऱ्यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील टेंभीनाका येथील देवीच्या मिरवणुकीदरम्यान भेट घेऊन त्यांना पाठींबा दिला. तसेच त्यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. बाळासाहेबांची सावली असलेले चंपासिंग थापा आणि सेवेकरी मोरेश्वर राजे अशी त्या दोघांची नावे असून त्यामध्ये थापा यांनी ठाकरे कुटुंबावर टीका न करता,आपल्या मनाला जे वाटले म्हणून आपण मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला आलो असे सांगितले.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची सावली समजले जाणारे चंपासिंह थापा आणि मातोश्रीवर प्रदीर्घ काळ सेवा बजावलेले मोरेश्वर राजे यांनी सोमवारी टेंभी नाक्यावरील अंबे मातेच्या आगमन मिरवणुकीत देवीच्या साक्षीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मार्गक्रमण करणाऱ्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी, बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार जी व्यक्ती पुढे घेऊन जात आहे अशा व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे त्या दोघांनी सांगितले. याप्रसंगी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक,ठाणे जिल्हाप्रमुख शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, युवासेना विस्तारक राहुल लोंढे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
अशी आहे थापांची ओळख
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सेवेकरी म्हणून चंपासिंग थापा हे ओळखले जातात. बाळासाहेब हे राज्यात दौरे किंवा सभेनिमित्त जायचे. त्यावेळेस त्यांच्यासोबत थापा हे सावलीसारखे असायचे. बाळासाहेबांच्या प्रकृतीची काळजी घेणे, त्यांना औषधे देणे आणि जेवण देणे अशी कामे ते करीत होते.त्यामुळे मातोश्रीमधील एक सदस्य म्हणून ते ओळखले जायचे. बाळासाहेब यांच्या निधनानंतर थापा यांनी मातोश्रीसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. तर राजे यांनी मातोश्रीवर प्रदीर्घ काळ सेवा बजावले.
बाळासाहेबांबरोबर सदैव सोबत राहिलेल्या मंडळींनी, बाळासाहेबांच्या आणि हिंदूत्वाच्या विचारांच्या आपल्या शिवसेनेला पाठींबा दिला आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगत. उत्सव उत्साहात साजरे होणे ही काळाची गरज होती. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचे काम आता शिवसेना, भाजप युतीचे सरकार करीत असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.






