Homeठाणे-मेट्रो" महापालिकांवर भगवा फडकवणारच”

” महापालिकांवर भगवा फडकवणारच”

ठाण्यातील शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आक्रमक एल्गार

धनुष्यबाण आपल्याकडे असून बाळासाहेबांचे विचार आणि महाराष्ट्राच्या विकासाचा अजेंडा देखील आपलाच असेल

ठाणे : ठाणे हे केवळ शहर नसून इतिहास घडवणाऱ्या शिवसैनिकांची भूमी आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेना पक्षमेळाव्यात आगामी महापालिका निवडणुकांसाठी आक्रमक भूमिका मांडली. धनुष्यबाण आपल्याकडे असून बाळासाहेबांचे विचार आणि महाराष्ट्राच्या विकासाचा अजेंडा देखील आपलाच आहे. त्यामुळे विरोधकांना पाणी पाजून महापालिकांवर भगवा फडकवण्याचे आवाहन त्यांनी केले.

2022 साली महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील सरकार स्थापन झाले आणि त्या ऐतिहासिक निर्णयाची दखल जगातील 32 देशांनी घेतली, असा दावा शिंदे यांनी केला. ही सत्ता खुर्चीसाठी नसून सर्वसामान्य माणसासाठी आहे, असे सांगत त्यांनी आपल्या नेतृत्वाबाबतचा आत्मविश्वास व्यक्त केला. त्या कठीण काळात शिवसैनिकांनी दिलेल्या पाठबळामुळेच हे शक्य झाले, असेही ते म्हणाले.

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण तापले असून, महापालिकांमध्ये महायुतीचा भगवा डौलाने फडकणार, असा निर्धार शिंदे यांनी व्यक्त केला. नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेने मोठ्या प्रमाणावर लढत दिल्याचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विदर्भात जवळपास साडेसातशे जागांवर शिवसेनेचा भगवा पोहोचला, तर संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे चार हजार जागांवर धनुष्यबाण आणि भगवा झेंडा जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला. यासोबतच १४७ ते १८७ नगराध्यक्ष पदांपर्यंत शिवसेनेची ताकद पोहोचली, असे त्यांनी स्पष्ट केले. ही आकडेवारी म्हणजे केवळ निवडणुकीची गणिते नसून, राज्याच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेचा विचार, चिन्ह आणि संघटनात्मक उपस्थिती पोहोचल्याचे प्रतीक आहे, आणि म्हणूनच हा काळ महाराष्ट्राच्या इतिहासातील शिवसेनेचा सुवर्णकाळ असल्याचा ठाम दावा शिंदे यांनी केला.

मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसह विविध लोककल्याणकारी योजनांचा उल्लेख करत, शिंदे यांनी विकास प्रकल्पांना गती दिल्याचे सांगितले. यापूर्वी रखडवण्यात आलेल्या प्रकल्पांवरील स्थगिती हटवून राज्यभर विकासाची गंगा वाहू लागल्याचा दावा त्यांनी केला. परदेशी गुंतवणूक, पायाभूत सुविधा, महामार्ग, मेट्रो आणि गृहनिर्माण प्रकल्पांमुळे महाराष्ट्र विकासाच्या प्रत्येक आघाडीवर पुढे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिंदे यांनी शिवसेना घरात बसून वाढत नाही, तर रस्त्यावर उतरून काम केल्यानेच मजबूत होते, असे ठामपणे सांगितले. तिकीट न मिळाल्याने नाराज न होता संघटना मजबूत करण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. लोकांची सेवा हाच शिवसेनेचा खरा अजेंडा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

भाषणादरम्यान धर्मवीर आनंद दिघे यांचा वारंवार उल्लेख करत, ठाणे हे त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे केंद्र असल्याचे शिंदे यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि आनंद दिघे यांचा वारसा कोणीही पुसू शकत नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या पक्षमेळाव्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पुन्हा एकदा शिवसेनेचा बालेकिल्ला राहणार असल्याचा ठोस संदेश दिला. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त करत, हा मेळावा केवळ सभा नसून येणाऱ्या निवडणुकांसाठी दिलेला राजकीय इशारा असल्याचे स्पष्ट झाले.

error: Content is protected !!