नोव्हेंबर महिन्यात १०६ कर्मचाऱ्यांच्या ११५ तर डिसेंबरला ४६ कर्मचाऱ्यांच्या ५० रजा कापल्या
ठाणे: – सरकारी नोकरी म्हणजे कधी या आणि कधी पण जा असाच गैरसमज तेथे काम करणाऱ्यांमध्ये पाहण्यास मिळतो. त्यातच ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी महाविद्यालया पाठोपाठ आरोग्य केंद्र आणि प्रसूतीगृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा हा गैरसमज दूर होऊन त्यांना शिस्त लागावी, यासाठी बायोमेट्रिक फेस रिडींग मशीन बसण्यात आली आहे. त्यामुळे अखेर २०२५ या नव्या वर्षातील जानेवारी महिन्यात शिस्त लागल्याचे प्रखरपणे दिसत आहे. मात्र नोव्हेंबर महिन्यात १०६ कर्मचाऱ्यांच्या ११५ तर डिसेंबर महिन्यात ४६ कर्मचाऱ्यांच्या ५० रजा कापण्यात आल्या होत्या. तीन दिवस उशिरा आल्यावर एक दिवसाची रजा कापण्यात येत असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली.
ठाणे महानगर पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना अधिक चांगल्या पद्धतीने व वेळेत उपचार मिळावे, यासाठी मध्यंतरी पालिका प्रशासनाने काही धोरणात्मक निर्णय घेतले. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय यांची कार्यक्षमता वाढवणे, रुग्णांना जलद सेवा मिळणे आणि रुग्ण सेवेचा दर्जा उन्नत करणे, त्यातून रुग्णांना अधिक फायदा व्हावा या उद्देशाने विविध स्वरुपाची पावले उचलण्यात आली होती. डॉक्टर्स आणि वैद्यकिय कर्मचारी पूर्णवेळ उपस्थित राहिले तर रुग्णसेवा सक्षम होण्यास फार मोठी मदत होते. अनेकदा अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी वांरवार गैरहजर राहणे, वेळेवर कर्तव्यावर हजर न राहणे, आदी तक्रारीमुळे या ठिकाणी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली बसविण्यात आली. त्याचा चांगला फायदा झाल्याचे निदर्शनास आले. याचदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रांवर, प्रसूती केंद्रावर अनेकदा वेळेवर डॉक्टर उपलब्ध नसणे, रुग्णांना केसपेपर घेण्यासाठी तासनंतास रांगेत उभे लागते. त्यामुळे, रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत असून त्यांना वेळेत उपचार मिळत नसल्याची ओरड होत असते. डॉक्टर व इतर स्टाफ वेळेत उपलब्ध राहावेत या उद्देशाने आता महापालिकेच्या ३३ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, सहा प्रसुतीगृह केंद्र, प्राचार्य प्रशिक्षण केंद्रासह पशु वैद्यकीय केंद्रात देखील फेस रिडींग मशीन बसविण्यात आले असून त्यानुसार नोव्हेंबर २०२४ मध्ये फेसरीडिंग मशीन बसविण्यात आली अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली. तर पहिल्या म्हणजे नोव्हेंबर महिन्या वेळेचे पालन न करणाऱ्यांच्या रजा कापण्यात आल्या. त्याचा परिणाम डिसेंबर महिन्यात दिसून आला आहे. त्यानुसार १०६ वरुन ४६ वर आल्याचे दिसून आले. त्यातही तीन पेक्षा जास्त वेळे उशीराने येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रजा कपात करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. शिवाय जानेवारी महिन्यात तेथील कर्मचारी शिस्तीच्या परीक्षेत पास झाले असेच म्हणावे लागणार आहे.