Homeठाणे-मेट्रोराज्यातील सर्वात मोठे ‘निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह’ वाघबीळ येथे उभारले जाणार

राज्यातील सर्वात मोठे ‘निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह’ वाघबीळ येथे उभारले जाणार

२५०० आसन व्यवस्था असलेले अत्याधुनिक नाट्यगृह, २००० चौरस मीटरचा प्रशस्त प्लाझाची सुविधा

ठाणे : ठाणे शहर झपाट्याने विस्तारत आहे. ठाणेकरांच्या मागणीनुसार मनोरंजनासाठी घोडबंदर वाघबीळ येथे राज्यातील सर्वात मोठे ‘तीर्थरुप निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह’ उभारण्यात येत आहे. सुमारे २५०० प्रेक्षक क्षमतेचे हे नाट्यगृह सांस्कृतिक क्षेत्रासाठी एक मोठी देणगी ठरणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री मा. ना. प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सदर नाट्यगृहाचे भूमिपूजन महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वीच करण्यात आले आहे. परंतु निधी अभावे या नाट्यगृहाचे काम रखडले होते. आता राज्य शासनाने या प्रकल्पासाठी एकूण १३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याचे कालच शासन निर्णय काढण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ८५ कोटी तर दुसऱ्या टप्प्यात ५३ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. यासाठी उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेबांचे मी आभार मानतो. येत्या तीन वर्षात हे नाट्यगृह ठाणेकरांच्या सेवेत दाखल होईल, असे सरनाईक यांनी सांगितले.

सुमारे ७३०० चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारल्या जाणाऱ्या या नाट्यगृहात २५०० आसन क्षमता असेल. त्यामध्ये मुख्य सभागृहात १६०० आसने, तसेच दोन बाल्कनीत प्रत्येकी सुमारे ४५० आसनांची व्यवस्था असणार आहे. विशेष म्हणजे, रंगमंचाची उंची ‘गडकरी रंगायतन’पेक्षा तब्बल १२ मीटर अधिक ठेवण्यात येणार आहे, ज्यामुळे भव्य नाट्यप्रयोग सादर करणे शक्य होईल.

नाट्यगृहाच्या परिसरातील सुमारे ६० टक्के जागा मोकळी ठेवून सुमारे २००० चौरस मीटरचा प्रशस्त प्लाझा उभारण्यात येणार आहे. या प्लाझामध्ये एकावेळी १५०० ते २००० नागरिक उभे राहू शकतील तसेच लाईव्ह इव्हेंट्स, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. परिसरात आकर्षक गार्डनही विकसित केले जाणार आहे. वाहनतळाची मुबलक व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे ६५० चारचाकी आणि ३०० दुचाकींसाठी पार्किंगची सोय असेल. याशिवाय तीन मजल्यांची पार्किंगची सुविधा दिली जाणार आहे.

नाट्यगृहात प्रेक्षकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये ६ लिफ्ट, एस्कलेटर, प्रशस्त आसनव्यवस्था, स्वच्छतागृहे यांचा समावेश आहे. दिव्यांगांसाठी विशेषतः पहिल्या रांगेत १२ आसनांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. कलाकारांसाठी स्वतंत्र लिफ्ट, बॅकस्टेज सुविधा तसेच दोन मोठे बँक्वेट हॉल (प्रत्येकी १००० क्षमतेचे) उभारण्यात येणार असून, त्यातून महानगरपालिकेला उत्पन्न मिळणार आहे. नाट्यगृहाच्या देखभालीसाठी हे उत्पन्न महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकल्पाच्या नियोजनासाठी लवकरच रंगकर्मी, दिग्दर्शक आणि कलाकारांची बैठक घेण्यात येणार असून, त्यांच्या सूचनांनुसार पुढील कामाला सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती सरनाईक यांनी दिली. हे नाट्यगृह केवळ ठाण्यासाठी नव्हेतर आपल्या राज्यासाठी सांस्कृतिक वैभव ठरणार आहे, असा विश्वास यानिमित्ताने सरनाईक यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!