ठाणे:- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीष श्रीनिवास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार,.13 सप्टेंबर 2025 रोजी ‘राष्ट्रीय लोकअदालत’ चे आयोजन करण्यात आले आहे. न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली प्रकरणे आणि दाखल पूर्व प्रकरणे सुनावणीसाठी लोक अदालतीमध्ये ठेवता येतील. संबंधितांनी ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यातील न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी व राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ घेण्यासाठी येत्या शनिवार, दि.13 सप्टेंबर, 2025 रोजी आयोजित केलेल्या लोकअदालतीमध्ये आपली प्रकरणे ठेवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. रविंद्र पाजणकर यांनी केले आहे.
लोक अदालतच्या निवाडयाविरुध्द अपील नाही, एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते, खटल्यांमध्ये साक्षी पुरावा, उलटतपासणी, दिर्घ युक्तीवाद या बाबी टाळल्या जातात. निकाल झटपट लागतो. लोक अदालतीत होणारा निवाडा हा आपआपसात समजुतीने होत असल्याने कुणाची हार वा जीत होत नाही. लोक अदालतीचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो, परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकांतील द्वेष वाढत नाही व कटुताही निर्माण होत नाही. कोर्टाच्या हुकूमनाम्याप्रमाणे लोकअदालतीत होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते, वेळ पैसा यांची बचत होते, इतकेच नव्हे तर लोक अदालतीत निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फिची रक्कम परत मिळते. लोकअदालतचे महत्व लक्षात आल्याने यापूर्वी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालत मध्ये ठाणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून राष्ट्रीय लोकअदालतचा फायदा पक्षकारांना मिळाला आहे.
मागील 2 लोकअदालत मध्ये विक्रमी प्रकरणे निकाली काढण्यात यश
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे मार्फत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील (माहे 22 मार्च 2025 आणि 10 मे, 2025 मध्ये एकूण 60392 न्यायालयीन प्रलंबित आणि 139662 दावा दाखल पूर्व प्रकरणे) लोकअदालतीमध्ये निकाली काढण्यात आली. कोट्यावधी रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम संबंधितांना मिळाली आहे.
वाहन चलनाच्या प्रकरणांसाठी स्वतंत्र पॅनल
वाहनांची वाढती संख्या व वाहन चालकांकडून वाहन कायदा तरतुदीचे उल्लंघन वाढत असून त्याविषयीची तडजोडपात्र लाखो प्रकरणे दाखल होतात. तरी, अशा प्रकरणांची दखल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने घेतली असून त्यासाठी स्वतंत्र पॅनलची व्यवस्था केली आहे. तरी, ज्यांची वाहन चलनाची प्रकरणे आहेत त्यांनी त्वरीत संबंधीत वाहन शाखेशी संपर्क साधावा, असे अवाहन करण्यात आले आहे.
दाखल पूर्व ही प्रकरणे ठेवता येतील
जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालयांमध्ये 13 सप्टेंबर, 2025 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये धनादेश अनादर प्रकरणे, बॅंकेचे कर्ज वसूली प्रकरणे, कामगारांचे वाद, कर वसुलीचे प्रकरणे, विद्युत आणि पाणी देयक बद्दलची प्रकरणे आणि इतर आपसात तडजोड पात्र प्रकरणे, वैवाहिक व इतर दिवाणी वाद, दाखल पूर्व ही प्रकरणे ठेवता येतील.
न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे ठेवता येतील
आपआपसात तडजोड करण्याजोगे फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, वैवाहिक वाद, कामगारांचे वाद, भूसंपादन प्रकरणे, विद्युत आणि पाणी देयक बद्दलचे प्रकरणे, सेवा विषयक पगार, भत्ते व सेवा निवृत्तीचे फायदे-विषयक प्रकरणे, महसूल प्रकरणे, इतर दिवाणी प्रकरणे जसे भाडे, वहिवाटीचे हक्क, मनाई हुकमाचे दावे, विशिष्ट पूर्व बंध कराराची पूर्तता विशयक वाद आदी न्यायालयात प्रलंबित प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवता येतील.
तरी आपली प्रलंबित तसेच दाखल व्हावयाचे आहेत अशी प्रकरणे दि.13 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सुनावणीसाठी ठेवण्याकरिता संबंधित न्यायालयातील तालुका विधी सेवा समिती अथवा जिल्हा विधी सेवा समिती प्राधिकरण यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि लोक अदालतीमध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने कायमचे मिटवावेत, असे आवाहन ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सचिव न्या. रविंद्र श्रीराम पाजणकर यांनी केले आहे.