कॅडबरी सिग्नलवरील आयटीएमएस प्रणाली सी सी कॅमेऱ्याची अडिच महिन्यातील कामगिरी
ठाणे :- वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३० हजार ८५ वाहन चालकांना वाहतुक पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याने टिपले आहे. ठाणे पोलिसांनी कॅडबरी सिग्नलवर सप्टेंबर महिन्यात कार्यन्वित केलेल्या एआय आधारीत आयटीएमएस सी सी टिव्ही कॅमेऱ्यानी अडिच महिन्यात ही कामगिरी बजावली असुन सर्व दोषी वाहन चालकांना दंडासह ई चालान पाठवले आहे. २४ तास कार्यान्वित असलेल्या या हाय-डेफिनेशन सी सी कॅमेऱ्यांद्वारे सिग्नलवरील वाहतुकीवर करडी नजर ठेवली जात आहे. तरी वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करून दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन ठाणे शहर वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयात ठाणे शहर, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कोपर, ठाकुर्ली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी क्षेत्राचा समावेश होतो. वाहतुकीला शिस्त लावण्याकरीता तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) प्रणालीचा अवलंब केला आहे. ०१ सप्टेंबरपासून ठाण्यातील कॅडबरी जंक्शन सिग्नलवर ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. मागील अडिच महिन्यात म्हणजेच सप्टेंबर ते १७ नोव्हेबर २०२५ पर्यंत कॅडबरी सिग्नलवर वाहतुक नियमभंग करणाऱ्या तब्बल ३० हजार ८५ वाहन चालकांना या अत्याधुनिक कॅमेऱ्यांनी टिपले आहे. यात सिग्नल ( *Jumping* ) मोडणाऱ्याची संख्या १८ हजार १६५ इतकी असुन विनाहेल्मेट दुचाकी चालवणारे १० हजार ६११ इतके आहेत. सिग्नलवरील स्टॉप लाईनवर न थांबणाऱ्या ८१५ आणि ट्रीपल सीट वाहने हाकणाऱ्या ४९४ जणांवर या प्रणालीद्वारे ई – चालान कारवाईचा बडगा उगारला आहे. त्या अनुसार, या दोषी वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये अंदाजे ३० लाख ८५ हजार इतका दंड आकारण्यात आला आहे.
वाहतुक नियमांबाबत ठाणेकरांमध्ये सजगता
ठाणे शहरातील कॅडबरी जंक्शन या वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या सिग्नलवर सप्टेंबर महिन्यात अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले. सप्टेंबर महिन्यात एकुण १६ हजार ७०९ वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम मोडले, यात सिग्नल जम्प करणारी तब्बल ११ हजार वाहने होती. ऑक्टोबर महिन्यात नियमभंगाचे प्रमाण घटले असुन एकुण ९ हजार ८२ वाहन चालक तर, १७ नोव्हेंबर पर्यंत नियम मोडणारी अवघी ४ हजार २९४ वाहने या कॅमेऱ्यांनी टिपली आहेत. या आकडेवारीनुसार नियमभंगाच्या घटनांमध्ये घट झाली असुन वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत ठाणेकरांमध्ये सजगता वाढल्याचे दिसुन आले आहे.






