दिवा:- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दिवा शहरप्रमुख सचिन पाटील यांनी मोठे संकेत दिले आहेत. दिवा शहर भागातील पक्षात कोणतेही अंतर्गत मतभेद नसून, आपला पक्ष महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांना सोबत घेऊन दिवा शहरातील सर्व जागा ताकदीने लढवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सचिन पाटील यांनी स्पष्ट केले की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आगामी महापालिका निवडणूक एकजुटीने लढणार आहे. दिव्यातील सर्व जागा जिंकण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही बांधणी करत आहोत,आम्ही येणाऱ्या महापालिका निवडणुकीत येथील सत्ताधारी पक्षाचा पराभव करू असे सचिन पाटील म्हणाले. दिव्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न का सुटले नाहीत ? याचे उत्तर सत्ताधारी यांनी द्यावे असे आव्हानही सचिन पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे.
विकासाच्या मुद्द्यांवर लढणार निवडणूक:-
दिवा शहरप्रमुख सचिन पाटील यांनी माहिती दिली की, महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांना सोबत घेऊन येणारी महापालिका निवडणूक ते विकासाच्या मुद्द्यांवर लढवणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेच्या पक्ष अध्यक्षांनी युतीचा निर्णय घेतल्यास दिवा शहरातही मनसेसोबत ताकतीने विरोधकांचा मुकाबला करू असेही सचिन पाटील म्हणाले.दिवा शहरातील सर्व 11 जागा जिंकण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही बांधणी करत आहोत. पक्षाचे सर्व कार्यकर्ते आतापासूनच कामाला लागले आहेत,” असेही त्यांनी सांगितले. पक्षात मतभेद असल्याच्या चर्चा निराधार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकजुटीने येथील सत्ताधारी पक्षा विरोधात लढेल असे पाटील म्हणाले.त्यांच्या या वक्तव्यावरून, दिवा शहरात आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे गट पूर्ण ताकदीने उतरून सत्ताधारी पक्षासमोर मोठे आव्हान निर्माण करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.