Homeठाणे-मेट्रोशिवसेनेचे माजी नगरसेवक शैलेश पाटील यांना जीवे मारण्याची धमकी, पाटील यांच्याकडून पोलिसांत...

शिवसेनेचे माजी नगरसेवक शैलेश पाटील यांना जीवे मारण्याची धमकी, पाटील यांच्याकडून पोलिसांत तक्रार दाखल

10 दिवसांत कारवाई न झाल्यास दिवा बंद व सामूहिक उपोषणाचा कार्यकर्त्यांचा इशारा

दिवा:– शिवसेनेचे दिव्यातील उपशहर प्रमुख व माजी नगरसेवक शैलेश पाटील यांना जीवे मारण्याची धमकी आली असून याबाबतची तक्रार शैलेश पाटील यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र देऊन केली आहे.
कैलास वालेकर व समिश गोविंदन या दोघांकडून मोबाईल फोन द्वारे सोमवारी आपणास जिवे मारण्याची धमकी आल्याचे शैलेश पाटील यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.शैलेश पाटील हे मागील दहा वर्षापासून दिवा शहरात नगरसेवक म्हणून कार्यरत असून त्यांचा उत्तम जनसंपर्क आहे.नागरिकांच्या समस्यांना धावून जाणारे नगरसेवक अशी त्यांची ओळख आहे. शिवाय शैलेश पाटील हे व्यावसायिक असून उद्योजक म्हणून ही त्यांची शहरात ओळख आहे. शिवसेनेचे नगरसेवक व उद्योजक असल्यानेच आपल्याला जाणीवपूर्वक टार्गेट करून जीवे मारण्याच्या धमक्या या दोघांकडून दिल्या जात असल्याचे शैलेश पाटील यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. आपल्यावर हल्ला झाल्यास कैलास वालेकर व समिश गोविंदन या समाजकंटकांना याबाबत जबाबदार धरण्यात यावे असेही शैलेश पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे. या दोन्ही इसमांचे गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध असून त्यांनी अंडरवर्ल्डच्या माध्यमातून आपल्यावर हल्ला करण्याचे नियोजन केले आहे का? याचा तपास करण्यासाठी दोघांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शैलेश पाटील यांनी या तक्रार अर्जात केली आहे. वरील दोन्ही इसम हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून बळजबरीने बेकायदेशीर रित्या लोकांच्या जमीन हडप करण्याचे काम त्यांच्याकडून होत असल्याचा आरोप शैलेश पाटील यांनी या तक्रार अर्जात केला आहे.ठाणे पोलिसांनी याबाबत तातडीने कारवाई करावी अशी मागणी शैलेश पाटील यांचे कार्यकर्ते करत आहेत.दरम्यान येत्या 10 दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास दिवा शहर बंद व सामूहिक उपोषणाचा इशारा शैलेश पाटील यांच्या कार्यकर्त्यानी दिला आहे.

error: Content is protected !!