Homeठाणे-मेट्रोशेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी ठाण्यातील शिवसेना धावली

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी ठाण्यातील शिवसेना धावली

जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे ट्रक मध्यरात्री धाराशिवकडे रवाना

ठाणे :- गेल्या काही दिवसांत मराठवाड्यातील ग्रामीण भागात पावसाचे अक्षरशः थैमान घातले. यात शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. पिके वाहून गेल्याबरोबर शेतकऱ्याच्या जमिनी खरडून गेल्या असल्याने शेतकरी चिंतेत आहे. सरकारी मदतीच्या आशेवर शेतकरी बसला आहे. दरम्यान, चिंताग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धावून गेली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे लोकसभा मतदारसंघातून जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याच्या किटचे ट्रक मध्यरात्री धाराशिवकडे रवाना झाले आहेत.

मुसळधार पावसामध्ये महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. घरं, जनावरं आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेती पाण्याखाली गेली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राज्यभरातून शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठाण्यातून देखील मदतीचा ओघ सुरू झाला आहे. किटचे वाटप करण्यात आले असून या प्रत्येक किटमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. दैनंदिन वापरातील गरजेच्या वस्तूंपासून अन्नधान्यापर्यंत सर्व काही धाराशिव येथे पाठवण्यात आले आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील सर्व जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख तसेच सर्व महत्वपूर्ण पदाधिकारी यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावून त्यांची दिवाळी आनंदात जावी यासाठी त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे व अन्नधान्याचे किट भरलेले ट्रक रवाना झाले आहेत. यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे त्यांच्यासोबत संपर्कप्रमुख नरेश मनेरा, जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रभाकर म्हात्रे, प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे शहर प्रमुख अनिश गाढवे, व इतर पदाधिकारी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!