रिक्षा दुचाकी जळून खाक
ठाणे: शहरात वेगवेगळ्या चार घटनांमुळे सोमवारी आगीच्या घटनांचा भडका उडाल्याचे समोर आले. यामध्ये धावत्या रिक्षासह पार्क केलेल्या दुचाकीने ही पेट घेतला आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान या बारा तासांमध्ये या घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत रिक्षाचालकाने वेळीच रिक्षातून बाहेर धाव घेतल्याने सुदैवाने तो बचावला आहे. या घटनांमध्ये तीन घटना या नियंत्रणात आणण्यात स्थानिक नागरिकांनी प्रामुख्याने पुढाकार घेतल्याचे समोर आले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
सोमवारी मध्यरात्री पावणे तीन वाजण्याच्या सुमारास लोकमान्य नगर पाडा क्रमांक ०४, या ठिकाणी रोड लगत पार्क केलेल्या या दुचाकी वाहनाला आग लागली होती. ती आग स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दल यांनी वीस मिनिटात नियंत्रणात आणली. या घटनेत दुचाकी जळून खाक झाली आहे. दुसरी घटना,
हाजुरी,या ठिकाणी गुरुप्रेरणा इमारतीच्या सहाव्या मजल्यावरती डकमध्ये असलेल्या इलेक्ट्रिक वायरिंगला किरकोळ आग लागली होती. ही घटना पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास समोर आली. ही लागलेली किरकोळ आग स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास नियंत्रणात आणली. तिसरी घटना, सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास
घोडबंदर रोडवरील नागला बंदर जवळील मोकळ्या मैदानामध्ये असलेल्या सुक्या लाकडांना आग लागली. ही आग अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत, नियंत्रणात आणली. तसेच चौथी घटना ही सोमवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास पोखरण रोड नंबर १ या ठिकाणी सिंघानिया शाळेसमोर घडली. वर्तकनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावरती रिक्षा पेटली. रिक्षाला आग लागल्याचे समोर आल्यावर रिक्षा चालक रमेश राठोड यांनी रिक्षातून बाहेर धाव घेतली. सुदैवाने यावेळी प्रवासी नसल्याने मोठे अनर्थ टळले. ही लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच स्थानिक नागरिकांनी खाजगी टँकरच्या मदतीने नियंत्रणात आणली. या घटनेत रिक्षा जळून खाक झाली आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.






