Homeठाणे-मेट्रोस्थानिक गुंडगिरीने व्यापारी धास्तावले.. संरक्षणासाठी आ. संजय केळकर यांच्याकडे धाव

स्थानिक गुंडगिरीने व्यापारी धास्तावले.. संरक्षणासाठी आ. संजय केळकर यांच्याकडे धाव

ठाणे: घोडबंदर पट्ट्यातील लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी स्थानिक गुंडांच्या जाचाला कंटाळून आज आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली. यावेळी केळकर यांनी स्थानिक पोलीस स्थानकातील वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधून गुंडांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या.

भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात त्रस्त व्यापाऱ्यांनी केळकर यांची भेट घेतली. कापूरबावडी, आझादनगर, ब्रह्माण्ड सर्कल आदी परिसरातील व्यापाऱ्यांचा यात समावेश होता. या परिसरातील स्थानिक गुंड विविध माध्यमातून व्यापाऱ्यांना त्रास देत असतात. व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर बेकायदेशीरपणे व्यवसाय करणे, व्यापाऱ्यांना मारहाण करणे यामुळे त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांनी केळकर यांना निवेदन देत संरक्षणाची मागणी केली. यावेळी केळकर यांनी संबंधित पोलीस स्थानकात अधिकाऱ्यांशी संपर्क साधून स्थानिक गुंडांचा बंदोबस्त करण्याची सूचना केली. हे व्यापारी प्रामाणिकपणे व्यवसाय करत असून त्यांना निर्धोक व्यवसाय करता यावा, यासाठी त्यांच्या पाठीशी राहू, असेही केळकर यांनी स्पष्ट केले. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी प्राधान्याने कारवाई हाती घेणार असल्याचे मान्य केल्याचे केळकर यांनी सांगितले.

जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात कामगार उपायुक्त, आणि बंद कंपन्यांतील कामगारांची संयुक्त बैठक घेण्यात आली. कामगारांची थकीत देणी ठराविक मुदतीत मिळावीत याबाबत चर्चा करण्यात आली. याबाबत कामगार उपायुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे केळकर यांनी सांगितले. ठाण्यात सुपरमॅक्स, वेलमन आदी कंपन्या बंद पडून शेकडो कामगार बेरोजगार झाले, त्यांची हक्काची देणी वर्षानुवर्षे थकल्याने त्यांच्यावर उपासमार ओढवली. या कामगारांच्या समस्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती केळकर यांनी दिली. या कार्यक्रमात मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांनीही उपस्थित राहून निवेदन दिले. प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा मोबदला पात्र शेतकऱ्याला न देता चुकीच्या लाभार्थ्याला देण्यात आल्याची तक्रार त्यांनी केली. याबाबत केळकर यांनी तत्काळ संबंधित तहसीलदारांना सूचना केल्या. याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे त्यांनी आश्वासन दिल्याचे.केळकर म्हणाले. जुन्या इमारतींचा पुनर्विकास करताना विकासकांकडून झालेल्या फसवणुकीबाबतही रहिवाशांनी यावेळी तक्रारी केल्या. या प्रकरणी संबंधित विकासक आणि गरज पडल्यास आर्किटेक्टवर देखील एमआरटीपीचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

कार्यक्रमात नगरसेवक विकास पाटील, नगरसेवक दीपक जाधव, सुरेश कांबळे, संजय पाटील, राजेश गाडे, अल्केश कदम, रुपेश कारंडे, आशिष कळसकर, योगेश भंडारी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!