दिवा:- महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत भारतीय जनता पक्षाला (भाजप) दिवा येथे धक्का बसला आहे. भाजपचे दिवा शीळ मंडळ कायदा सेल संयोजक असलेले ॲड. रविराज बोटले यांनी या निर्णयाच्या निषेधार्थ आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
बोटले यांनी आपल्या राजीनाम्याचे कारण स्पष्ट करताना म्हटले आहे की, “महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदी लादण्याचा सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे.” या भूमिकेतून त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या दिवा शीळ मंडळ कायदा सेल संयोजक पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले.
याचबरोबर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात घेतलेल्या भूमिकेला ॲड. बोटले यांनी एक मराठी माणूस म्हणून जाहीर पाठिंबा दिला आहे. ५ जुलै रोजी होणाऱ्या या हिंदी सक्तीविरोधी मोर्चात आपण सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयावरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.