दोषीं विरोधात पक्षांतर्गत कठोर शिस्तभंगाची कारवाई करणार
कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्री नगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेली मारहाणीची कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही माफी दिली जाणार नाही. दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे. लोकप्रतिनिधी आणि डॉक्टर म्हणून आपण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सर्व रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत ठामपणे उभे आहोत, अशी ग्वाही खासदार डॉ. शिंदे यांनी एक्स पोस्टमधून दिली.
या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. खासदार डॉ. शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. एक्स पोस्टद्वारे खासदार डॉ. शिंदे यांनी पक्षांतर्गत गैरवर्तन करणाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला. एक्स पोस्टमध्ये खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, एक डॉक्टर म्हणून रुग्णसेवा ही केवळ एक नोकरी नसून ती मानवतेची सेवा आहे, याची जाणीव आहे. अत्यंत प्रतिकूल आणि तणावपूर्ण परिस्थितीत डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असतात. त्यामुळे हल्ल्यात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पक्ष पाठीशी घालणार नाही. दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध पक्षांतर्गतही कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही खासदार डॉ. शिंदे यांनी दिली. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि निर्भयपणे सेवा देण्याच्या अधिकाराचा सर्वांनी आदर केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.






