Homeशहर परिसरदातिवली तलावाचे विद्रुपीकरण हटवण्यास महापालिकेकडून सुरुवात; मनसेच्या मागणीला यश, मात्र थातुरमातुर कारवाई...

दातिवली तलावाचे विद्रुपीकरण हटवण्यास महापालिकेकडून सुरुवात; मनसेच्या मागणीला यश, मात्र थातुरमातुर कारवाई खपवून घेणार नाही!

दिवा शहरातील दातिवली तलाव परिसरात छठपूजेच्या निमित्ताने सिमेंट व मातीचे चौथरे तयार करून त्यावर आयलंड पट्ट्या लावून नावे व नंबर लिहिण्यात आले होते. यामुळे तलावाच्या नैसर्गिक सौंदर्याला बाधा पोहोचत असून तलाव परिसराचे विद्रुपीकरण होत असल्याचा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपस्थित केला होता.

यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहराच्या वतीने उपशहर अध्यक्ष किरण दळवी यांच्या नेतृत्वाखाली विभाग अध्यक्ष शैलेंद्र कदम यांनी दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना लेखी निवेदन देऊन तलाव परिसरातील अनधिकृत चौथरे हटवावेत, रंगकाम व इतर विद्रुपीकरण तात्काळ थांबवावे तसेच छठपूजेसाठी स्वतंत्र जागा व योग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली होती.

याच अनुषंगाने आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वॉर्ड ऑफिसर यांची भेट घेऊन या विषयाचा पाठपुरावा केला. मनसेच्या तक्रारीची दखल घेत महापालिका प्रशासनाने तलाव परिसरातील विद्रुपीकरण हटवण्यास सुरुवात केली आहे.

मात्र, ही कारवाई केवळ वरवरची किंवा थातुरमातुर ठरू नये. तलाव परिसरातील सर्व अनधिकृत बांधकामे व विद्रुपीकरण पूर्णपणे हटवून तलावाचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवावे. तसेच भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी महापालिकेने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अधिक आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.

तलाव हे शहराचे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे जलस्रोत आहेत. धार्मिक उत्सवांना आमचा विरोध नाही; मात्र धार्मिक विधींच्या नावाखाली सार्वजनिक नैसर्गिक संपत्तीचे नुकसान होता कामा नये, हीच मनसेची भूमिका आहे.

यावेळी महिला उपशहर अध्यक्ष नम्रता खराडे, विभाग सचिव सुशांत तांडेल, उपविभाग अध्यक्ष धनेश पाटील, शाखाध्यक्ष विराज पाटील, रमेश शिंदे, विशाल दुडाम आणि इतर मनसे पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, दिवा शहर

error: Content is protected !!