दिवा :ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यालगतच्या सार्वजनिक गटारांमध्ये टोरंट पॉवर लिमिटेड कंपनीकडून बेकायदेशीरपणे व धोकादायक पद्धतीने विद्युत केबल्स टाकण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या केबल्समुळे पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळित होऊन परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबत आहे. या समस्येची दखल घेत ठाणे महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक २७ चे नगरसेवक अॅड. आदेश कमलाकर भगत यांनी टोरंट पॉवर कंपनीला तीव्र इशारा देणारे निवेदन दिले आहे. सार्वजनिक गटारांमधील या केबल्स तात्काळ हटवून पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नागरिकांची सुरक्षितता धोक्यात
नगरसेवक आदेश भगत यांनी निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक गटारे ही केवळ पावसाच्या व सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी निर्माण केलेली सार्वजनिक मालमत्ता आहे. परंतु, टोरंट पॉवरने त्यात केबल्स टाकल्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचत आहे. याचा मोठा फटका शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना बसत आहे. साचलेल्या पाण्यामुळे केवळ वाहतुकीची कोंडी होत नसून, अपघातांचा धोका आणि साथीच्या आजारांचा प्रसार वाढला आहे. तसेच पाण्यात वीज उतरून मोठी दुर्घटना घडण्याची भीतीही निर्माण झाली आहे.
महानगरपालिकेच्या कामात अडथळा
या विद्युत केबल्समुळे ठाणे महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना गटारांची नियमित साफसफाई करणे, गाळ उपसणे आणि पावसापूर्वीची देखभाल करणे अत्यंत कठीण झाले आहे. परिणामी, प्लास्टिक आणि कचरा साचून ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी न घेता अशा प्रकारे केबल्स टाकणे चुकीचे असल्याचे भगत यांनी नमूद केले.
कायदेशीर कारवाईचा इशारा
टोरंट पॉवर प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने संयुक्त पाहणी करून या सर्व केबल्स सुरक्षित व पर्यायी मार्गाने स्थलांतरित कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या समस्येवर तात्काळ आवश्यक ती कार्यवाही न केल्यास, नागरिकांच्या हितासाठी संबंधित प्रशासकीय आणि कायदेशीर प्राधिकरणांकडे दाद मागण्याचा इशारा नगरसेवक अॅड. आदेश भगत यांनी दिला आहे. त्यामुळे आता टोरंट पॉवर कंपनी यावर काय पावले उचलते, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.






