दिवा : दिवा शहरातील संदीप पाटील नगर येथे दि ग्रेट संदीप दादा प्रतिष्ठान आणि तन्वी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नवरात्रोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले. या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ अर्थात ‘खेळ रंगला पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला दिवा परिसरातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला.
तन्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. ज्योती राजकांत पाटील यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही महिलांसाठी विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ज्योती पाटील या तन्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा असून शिवसेना ठाकरे गटाच्या दिवा शहर संघटिका तसेच भिवंडी ग्रामीण व शहापूर संपर्क संघटिका म्हणूनही कार्यरत आहेत.
‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी विविध मनोरंजक खेळ, संगीताच्या तालावर आधारित स्पर्धा आणि मनोरंजनात्मक उपक्रम राबवण्यात आले. महिलांनी या स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेतल्याने कार्यक्रमस्थळी आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणित व्हावा, हा या उपक्रमामागील उद्देश होता.
स्पर्धेतील विजेत्या महिलेला मानाची पैठणी आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिलांना हळदीकुंकवाचे वाण देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.






