Homeशहर परिसरदिव्यात लहान मुलांसाठीच्या 'विटामिन ए' औषधाचा तीव्र तुटवडा; ७ दिवसांत पुरवठा न...

दिव्यात लहान मुलांसाठीच्या ‘विटामिन ए’ औषधाचा तीव्र तुटवडा; ७ दिवसांत पुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा शिवसेना शहरप्रमुख सचिन पाटील यांचा इशारा

दिवा (ठाणे): दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये आणि आशा वर्कर्स (ASHA Workers) कडे लहान मुलांसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या ‘विटामिन ए’ (Vitamin A) या औषधाचा गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तीव्र तुटवडा जाणवत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दिवा शहरप्रमुख श्री. सचिन पाटील यांनी ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांना लेखी पत्र लिहून औषधांचा पुरवठा तातडीने उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील लहान मुलांमधील कुपोषण, अंधत्व रोखण्यासाठी आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ठराविक अंतराने ‘विटामिन ए’ चे डोस देणे बंधनकारक आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हा पुरवठा खंडित झाल्यामुळे दिव्यातील शेकडो गरीब व गरजू कुटुंबांतील लहान मुले या आवश्यक डोसपासून वंचित आहेत, जे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) च्या नियमांनुसार बालकांमधील अंधत्व निवारणासाठी ‘विटामिन ए’ चा डोस वेळेवर मिळणे हा त्यांचा आरोग्यविषयक हक्क आहे, तसेच माता व बाल संगोपन औषधांचा साठा अखंडित ठेवणे स्थानिक प्रशासनाचे (महानगरपालिका) कर्तव्य आहे. दिव्यातील गरीब जनता पूर्णपणे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर अवलंबून असताना औषधांचा हा तुटवडा म्हणजे बालकांच्या आरोग्याशी खेळण्यासारखा आहे, असे सचिन पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.
शिवसेना दिवा शहरातर्फे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:
१. दिवा प्रभाग समिती अंतर्गत सर्व आरोग्य केंद्र आणि आशा वर्कर्सना ‘विटामिन ए’ चा पुरेसा साठा पुढील ७ दिवसांच्या आत तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा.
२. गेल्या तीन-चार महिन्यांपासून हा औषध पुरवठा का खंडित झाला, याची सखोल चौकशी करून संबंधित दोषी विभागावर त्वरित कारवाई करण्यात यावी.
या गंभीर विषयावर प्रशासनाने सात दिवसांच्या आत सकारात्मक पावले उचलून पुरवठा सुरळीत केला नाही, तर स्थानिक नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि बालकांच्या हक्कासाठी प्रशासनाविरोधात पुढील तीव्र प्रशासकीय व कायदेशीर दाद मागण्यात येईल, असा इशाराही शिवसेना शहरप्रमुख सचिन पाटील यांनी दिला आहे.

error: Content is protected !!