दिवा : सलग तीन-चार दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली असून, या पार्श्वभूमीवर दिवा शहरातील स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शहरातील अनेक भागांमध्ये कचरा साचून राहिल्याने तसेच काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ठाणे महापालिका प्रशासनाने तातडीने कचरा उचलणीसह डास नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट) दिवा शहर संघटिका ज्योती पाटील यांनी केली आहे.
ज्योती पाटील यांनी सांगितले की, शहरातील प्रत्येक प्रभागात साचलेला कचरा त्वरित हटवून स्वच्छता करण्यात यावी. तसेच मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डास नियंत्रक धूर फवारणी आणि औषध फवारणी नियमितपणे करण्यात यावी. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून, महापालिकेच्या संबंधित विभागाने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. पावसानंतर निर्माण होणाऱ्या संभाव्य आरोग्यविषयक धोक्यांचा विचार करून संपूर्ण दिवा शहरात प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात यावी, अशी मागणी ज्योती पाटील यांनी केली.






