Homeशहर परिसरराहुल गांधींच्या समर्थनार्थ ठाणे काँग्रेस आक्रमक; केंद्राविरोधात ‘रास्ता रोको’!

राहुल गांधींच्या समर्थनार्थ ठाणे काँग्रेस आक्रमक; केंद्राविरोधात ‘रास्ता रोको’!

निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी जोरदार आंदोलन; राहुल पिंगळेंसह पदाधिकाऱ्यांना अटक व सुटका
ठाणे : लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर घेत ठाणे काँग्रेसने केंद्र सरकार व निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारला. राहुल गांधींवरील कथित दडपशाहीच्या निषेधार्थ ठाण्यात जोरदार ‘रास्ता रोको’ आंदोलन करत काँग्रेसने आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केला. विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न थांबवून निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणावी, अशी मागणी यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले. ठाणे शहर काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व शहराध्यक्ष राहुल कारभारी पिंगळे यांनी केले. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक व्यवस्थेबाबत काँग्रेसची भूमिका ठामपणे मांडली.

७ ऑक्टोबर रोजी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी तसेच ‘INDIA’ आघाडीच्या खासदारांवर पोलिसी बळाचा वापर करून दडपशाही केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या घटनेचा ठाणे काँग्रेसने तीव्र निषेध केला. शांततापूर्ण पद्धतीने प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांचा आवाज दाबण्याऐवजी त्यांच्या मागण्यांवर चर्चा झाली पाहिजे, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या देत ‘रास्ता रोको’ केल्याने परिसरातील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना अटक करून नंतर त्यांची सुटका केली.

आंदोलनाचे नेतृत्व करताना राहुल पिंगळे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. निवडणूक व्यवस्थेतील पारदर्शकता आणि निष्पक्षतेसाठी आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना पोलिसी बळाचा वापर करून अडवणे हा लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाहीचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न काँग्रेस सहन करणार नाही. निवडणूक व्यवस्थेची अखंडता पूर्णपणे पुनर्स्थापित करण्यासाठी आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा लढा सुरू असून तो आणखी तीव्र केला जाईल, असा इशारा पिंगळे यांनी दिला.

या आंदोलनात प्रदेश पदाधिकारी, प्रदेश सदस्य, ठाणे काँग्रेसचे वरिष्ठ नेते मंडळी,ब्लॉक अध्यक्ष, महिला काँग्रेस,सेवादल, युवक काँग्रेस तसेच विविध फ्रंटल सेल आणि विभागांचे पदाधिकारी यांच्यासह सर्व स्तरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

error: Content is protected !!