Homeठाणे-मेट्रोशिवसेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश; गणेशोत्सवात झाराप रेल्वे स्थानकावर ११२ विशेष गाड्यांना...

शिवसेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश; गणेशोत्सवात झाराप रेल्वे स्थानकावर ११२ विशेष गाड्यांना थांबा

ठाणे : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांच्या सोयीसाठी झाराप रेल्वे स्थानकावर यंदाच्या गणेशोत्सव विशेष गाड्यांपैकी ११२ विशेष गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला असून, त्यामुळे तळ कोकणातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा निर्णय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांचे फलित असल्याची माहिती श्री. विजय साबाजी देसाई, उपजिल्हाप्रमुख, कल्याण लोकसभा यांनी दिली.

कुडाळ व सावंतवाडी या स्थानकांच्या दरम्यान असलेले झाराप रेल्वे स्थानक हे अनेक वर्षांपासून कोकण रेल्वे मार्गावरील सर्वाधिक दुर्लक्षित स्थानक मानले जात होते. यापूर्वी येथे केवळ दिवा–सावंतवाडी ही एकमेव गाडी थांबत होती. त्यामुळे झारापसह परिसरातील नागरिकांकडून अधिक गाड्यांना थांबा देण्याची मागणी सातत्याने होत होती.

या मागणीसाठी मागील चार वर्षांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी कोकण रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. मागील वर्षी गणेशोत्सवाच्या तीन महिने आधी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) यांच्या बेलापूर येथील कार्यालयात शिवसेना उपनेते तथा कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली होती. या बैठकीत गणेशोत्सव काळात मालवाहतूक कमी करून अधिक विशेष गाड्या चालविणे आणि झाराप स्थानकाला अधिकाधिक थांबे देण्याची ठाम मागणी करण्यात आली होती.

त्या पाठपुराव्याची दखल घेत कोकण रेल्वेने मागील वर्षी १७४ अतिरिक्त फेऱ्यांना झाराप येथे थांबा दिला होता. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी पहिल्या विशेष गाडीचे ढोल-ताशांच्या गजरात आणि पेढे वाटून जल्लोषात स्वागत केले होते.

यंदा कोकण रेल्वेने पहिल्या टप्प्यात २४६ विशेष फेऱ्यांची घोषणा केली आहे. त्यापैकी ७२ फेऱ्या रत्नागिरीपर्यंत असून झारापच्या पुढे जाणाऱ्या १७४ फेऱ्यांपैकी तब्बल ११२ फेऱ्यांना झाराप येथे थांबा देण्यात आला आहे. पुढील टप्प्यात आणखी सुमारे १५० विशेष फेऱ्या जाहीर होण्याची शक्यता असून त्यापैकी किमान १०० फेऱ्यांनाही झाराप येथे थांबा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

झाराप हे स्थानक कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले तसेच माणगाव खोऱ्यातील सुमारे १०० गावांसाठी मध्यवर्ती व सोयीचे रेल्वे स्थानक आहे. तसेच रेडीचा गणपती, मानशीश्वर मंदिर, वेंगुर्ले बंदर, माणगाव परिसरातील प्रसिद्ध मंदिरे, यक्षिणी देवी मंदिर, वासुदेवानंद सरस्वती यांचे स्थान, आंबेरी-घावनाळे मंदिर, रांगणा गड, केरवडे शिवमंदिर, गुहा तसेच आंजीवडे येथील निसर्ग पर्यटनस्थळांसाठीही झाराप हे महत्त्वाचे प्रवेशद्वार ठरत आहे.

झाराप स्थानकाला अधिकाधिक गाड्यांचे थांबे मिळावेत यासाठी माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक, युवासेना पदाधिकारी मंदार शिरसाट, योगेश धुरी तसेच शिवसैनिक गोपाळ परुळेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

गणेशोत्सव विशेष गाड्यांचे आरक्षण १ ऑगस्ट २०२६ पासून सुरू होणार असून, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी लवकरात लवकर आरक्षण करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. विजय साबाजी देसाई, उपजिल्हाप्रमुख, कल्याण लोकसभा यांनी केले आहे.

error: Content is protected !!