ठाणे वाहतूक पोलीस आणि रोटरी क्लबचा संयुक्त उपक्रम
ठाणे : आणीबाणीच्या प्रसंगी किंवा अपघाताच्या वेळी ‘गोल्डन अवर’ मध्ये त्वरित उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी रोटरी क्लबच्या वतीने ठाणे वाहतूक विभागाला आज इमर्जन्सी ड्रामा किट मोफत देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता इमर्जन्सी ट्रॉमा किट अपघातानंतरचा ‘गोल्डन अवर’मधील जीव वाचवणार असल्याचा विश्वास रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
ट्रॉमा केअर किट हे अपघात, गंभीर जखमा किंवा जीवघेण्या परिस्थितींमध्ये दिली जाणारी विशेष तातडीची वैद्यकीय सेवा आहे. या सेवेत रुग्णाला झालेल्या दुखापतींचे त्वरित प्राथमिक उपचार देण्यात येतात. अपघात, रक्तस्राव आणि जीवघेण्या परिस्थितींमध्ये तत्काळ वैद्यकीय मदत देण्यासाठी वापरली जाणारी विशेष आपत्कालीन किट आहे. ट्रॉमा केअर किट मध्ये टूर्निकेट, हेमोस्टॅटिक गॉझ, चेस्ट सील, प्रेशर ड्रेसिंग, ट्रॉमा शेअर्स, हायपोथर्मिया ब्लँकेट या महत्वाच्या साहित्याचा समावेश आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व १८ वाहतूक विभाग किट देण्यात आल्या आहेत. ठाणे शहर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी येथील रोटरी क्लब्स या उपक्रमात सहभागी झाले. या उपक्रमाचे ठाणे वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी विशेष कौतुक केले आहे.
किटचे महत्व काय?
ट्रॉमा किट ही गंभीर रक्तस्राव, छातीला झालेली खोल जखम आणि शॉक यांसारख्या जीवघेण्या जखमांवर उपचार करण्यासाठी बनवलेली असते. रस्ते अपघात किंवा वाहनांची धडक, उंचावरून पडणे किंवा घसरून लागणे, डोक्याला गंभीर मार लागणे किंवा बेशुद्धावस्था, हाडे मोडणे, मणक्याची इजा, तसेच गोळीबार, चाकू हल्ला किंवा इतर हिंसक घटना अशा प्रसंगी वेळ वाया न घालवता वाहतूक पोलीस तसेच रुग्णाला तत्काळ मदत मिळणार आहे.






