Homeशहर परिसरखिडकाळी मंदिर परिसरात कृत्रिम विसर्जन तलावाच्या कामाला सुरुवात; गणेशमूर्ती विसर्जनासाठी पालिका प्रशासन...

खिडकाळी मंदिर परिसरात कृत्रिम विसर्जन तलावाच्या कामाला सुरुवात; गणेशमूर्ती विसर्जनासाठी पालिका प्रशासन सज्ज

दिवा:गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खिडकाळी मंदिर परिसर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन तलाव उभारणीच्या कामाला ७ सप्टेंबर २०२६ रोजी अधिकृत सुरुवात करण्यात आली आहे. येत्या चार ते पाच दिवसांत हा कृत्रिम तलाव पूर्णपणे तयार होणार असून, गणेशभक्तांना सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात विसर्जन करता यावे यासाठी पालिका प्रशासनाकडून सर्व आवश्यक तयारी केली जात आहे.
सन २०१८ पासून ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी कृत्रिम तलावाची व्यवस्था केली जात आहे. यापूर्वी खिडकाळी तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात असल्याने तलावातील जलचर व मासे मृत्यमुखी पडत होते. या नैसर्गिक तलावातील जैवविविधता जपण्यासाठी आणि पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने ठाणे पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करून येथे कृत्रिम तलावाची सोय करण्यात आली आहे. दरवर्षी या कृत्रिम तलावामध्ये हजाराहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन सुरक्षितपणे पार पडते.
गणेशोत्सवादरम्यान गणेशभक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आरोग्य सेवा, अग्निशमन दल, सुरक्षा रक्षक तसेच ठाणे पालिकेचे अधिकारी व कर्मचारी योग्य ती व्यवस्था तैनात ठेवणार आहेत.
याप्रसंगी नगरसेविका अर्चना निलेश पाटील, नगरसेवक बाबाजी पाटील, दीपेश पाटील यांच्यासह खिडकाळी परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!