Homeशहर परिसरदिवा उड्डाणपूल कोंडी: 'न्यायालयाच्या आदेशाची वाट न पाहता संयुक्त भूमापन करणार '...

दिवा उड्डाणपूल कोंडी: ‘न्यायालयाच्या आदेशाची वाट न पाहता संयुक्त भूमापन करणार ‘ – ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

दिवा (प्रतिनिधी): दिवा पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम मागील तब्बल १० वर्षांपासून रखडले आहे. रेल्वे प्रशासनाने आपल्या हद्दीतील पुलाचे काम पूर्ण केले असले, तरी ठाणे महापालिकेच्या हद्दीतील उड्डाणपुलाचे काम जमिनीच्या मोबदल्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे अर्धवट स्थितीत लटकले आहे. बाधित शेतकऱ्यांना अद्याप योग्य व वेळेत मोबदला न मिळाल्याने हा प्रश्न गंभीर बनला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिवा स्टेशन परिसराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रकल्पबाधित शेतकरी पांडुरंग भोईर आणि स्थानिक नागरिकांनी आयुक्तांची भेट घेऊन आपल्या तीव्र भावना आणि व्यथा मांडल्या.

संवादादरम्यान शेतकरी पांडुरंग भोईर यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर थेट सवाल उपस्थित केले. “आमच्यावर बेकायदेशीर बांधकामाचा ठपका ठेवून कारवाई केली जाते, मग प्रशासनाने योग्य अधिग्रहण न करता आणि मोबदला न देता आमच्या जमिनीवर उड्डाणपुलाचे खांब कसे उभारले?” असा जळजळीत प्रश्न त्यांनी विचारला. रस्त्याची रुंदी २४ मीटर नसून केवळ ७ मीटर आहे, तसेच सर्वेक्षणात अनेक त्रुटी राहिल्या असल्याचा आरोप करत भोईर यांनी या प्रकरणी न्यायालयात अवमान याचिका दाखल केल्याचे सांगितले. १३ गुंठे जमिनीचा योग्य मोबदला त्वरित मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली.

यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करत “दिवा शहरातील लाखो नागरिकांसाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांवर अन्याय न होता त्यांना योग्य मोबदला मिळावा आणि पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे,” अशी मागणी आयुक्तांकडे केली.

शेतकऱ्यांची बाजू आणि कागदपत्रे ऐकून घेतल्यानंतर आयुक्त सौरभ राव यांनी अत्यंत सकारात्मक आणि दिलासादायक भूमिका घेतली. आयुक्त म्हणाले की, “पुन्हा संयुक्त भूमापन करण्यासाठी महापालिकेला कोणत्याही न्यायालयाच्या नव्या आदेशाची आवश्यकता नाही. पालिका प्रशासन स्वतः पुढाकार घेऊन तात्काळ आणि निष्पक्ष भूमापन करेल.” तसेच, “बाधित शेतकऱ्यांचा कायदेशीर हक्क असल्यास पालिका एका रुपयाचाही मोबदला दाबून ठेवणार नाही, त्यांचा पूर्ण हक्क त्यांना दिला जाईल,” असे स्पष्ट आणि ठोस आश्वासन आयुक्त सौरभ राव यांनी दिले.

आयुक्तांच्या या आश्वासनामुळे गेल्या १० वर्षांपासून रखडलेल्या दिवा उड्डाणपुलाच्या कामाला आता गती मिळण्याची आणि बाधित शेतकऱ्यांना अखेर न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!