दिवा: दिवा शहरातील वैभव हॉटेलच्या मागे (वैभव ढाब्याच्या मागे) असलेली ‘दत्त निवारा’ ही इमारत अत्यंत धोकादायक झाली असून, काल (रविवार, ५ जुलै) या इमारतीच्या जिन्याचा आणि स्लॅबचा काही भाग कोसळल्याची गंभीर दुर्घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी इमारतीची रचना पूर्णपणे कमकुवत झाली आहे. भविष्यातील मोठी दुर्घटना टाळण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून रहिवाशांना तात्काळ इमारत खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पावसाळ्याचे दिवस असल्याने अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे येथील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसमोर राहण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लहान मुले, महिला आणि वृद्धांना घेऊन कुठे जावे, या विवंचनेत रहिवासी आहेत.
या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दिवा शहरप्रमुख श्री. सचिन पाटील यांनी दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, ठाणे महानगरपालिका यांना पत्र लिहून रहिवाशांना तात्काळ दिलासा देण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाच्या आदेशाचा मान राखून सर्व कुटुंब इमारत खाली करत आहेत. मात्र, मानवतावादी दृष्टिकोनातून आणि आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून या सर्व बाधित रहिवाशांना दिवा परिसरातील बी.एस.यू.पी. (BSUP) योजनेच्या रिकाम्या घरांमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचा निवारा उपलब्ध करून देण्यात यावा, अशी नम्र विनंती सचिन पाटील यांनी केली आहे. तसेच, या संदर्भातील पुढील कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रियेसाठी महानगरपालिकेने रहिवाशांना पूर्ण सहकार्य करावे, अशी मागणीही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.






