दिवा :मध्य रेल्वेवरील दिवा रेल्वे स्थानकातील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, सकाळी गर्दीच्या वेळेस डोंबिवली आणि कल्याण स्थानकातून सुटणाऱ्या ६ जलद गाड्यांना दिवा स्थानकात थांबा द्यावा, अशी मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे. संघटनेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक ॲड. आदेश भगत यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांची (DRM) भेट घेऊन या संदर्भातील निवेदन दिले.
मध्य रेल्वेवर दिवा स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. सध्या सकाळी गर्दीच्या वेळी दिवा स्थानकात थांबणाऱ्या बहुतांश जलद लोकल या कर्जत, कसारा, बदलापूर किंवा टिटवाळा येथून येतात. त्यामुळे या गाड्या आधीच प्रवाशांनी गच्च भरलेल्या असतात आणि दिव्यातील प्रवाशांना त्यात चढणे अशक्य होते. प्रवाशांची ही गैरसोय आणि गर्दीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे, असे ॲड. भगत यांनी सांगितले.
दिवा स्थानकात नुकतेच १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाटांची लांबी वाढवण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे खालील ६ जलद गाड्यांना दिवा येथे थांबा देणे तांत्रिकदृष्ट्या सहज शक्य आहे:
डोंबिवली-सीएसएमटी: सकाळी ६:१४
कल्याण-सीएसएमटी: सकाळी ६:३२, ७:१८, ८:३३, ९:४७ आणि १०:०२
दिवेकर प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुकर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने या मागण्यांचा तत्परतेने विचार करावा, अशी आग्रही मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.






