सामाजिक कार्यकर्ते अमोल केंद्रे यांचा खळबळजनक आरोप
ठाणे:-दिवा शहरात अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या एका कथित बंगाली डॉक्टरच्या चुकीच्या औषधोपचारामुळे १२ वर्षीय निष्पाप बालकाला आपला जीव गमवावा लागल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते श्री. अमोल धनराज केंद्रे यांनी केला आहे. कु. देवेंद्र आशिष सिंग असे मृत बालकाचे नाव असून, औषधाच्या दुष्परिणामामुळे तब्बल ७ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर १ जून २०२६ रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे केंद्रे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
या गंभीर घटनेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे तातडीचे निवेदन श्री. केंद्रे यांनी ठाणे पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाला (FDA) दिले आहे.
अमोल केंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत देवेंद्रला दिव्यातील एका बेकायदेशीरपणे प्रॅक्टिस करणाऱ्या ‘बंगाली डॉक्टर’ने औषध दिले होते. ते घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच त्याची प्रकृती खालावली आणि तो कोमात गेला. त्याला तातडीने मुंबईच्या केईएम रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सदर घटना घडल्यापासून संबंधित डॉक्टर क्लिनिक बंद करून फरार झाला आहे, असा दावाही केंद्रे यांनी केला आहे.
महापालिका आणि आरोग्य विभागाने संयुक्त मोहीम राबवून या संपूर्ण प्रकरणाची सत्यता तपासावी. तसेच दिव्यातील सर्व संशयित क्लिनिक आणि विनापरवाना औषध विक्रेत्यांची चौकशी करून दोषींवर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी अमोल केंद्रे यांनी प्रशासनाकडे केली आहे.






