Homeकोकण-महाराष्ट्रघोडबंदरच्या पाणीटंचाईवर उतारा; दोन दिवसात कृती आराखडा

घोडबंदरच्या पाणीटंचाईवर उतारा; दोन दिवसात कृती आराखडा

आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात उठवला आवाज

ठाणे:  घोडबंदर पट्ट्यातील पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून त्यावर तोडगा काढण्याऐवजी महापालिका टँकरमाफियांना पोसत असल्याचा आरोप होत आहे. याबाबत आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनातही आवाज उठवला आहे. येत्या शुक्रवारी महापालिकेत बैठक होणार असून त्यावेळी कृती आराखडा ठरणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

      घोडबंदर पट्ट्यात मोठमोठी गृहसंकुले उभारण्यास महपालिकेने परवानगी देताना, त्यांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याबाबत मात्र चालढकल केली जात आहे. परिणामी लाखो रुपयांची कर्जे घेऊन घरखरेदी करणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर महिन्याकाठी लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. यावर पालिकेमार्फत ठोस उपाययोजना होत नसल्याने टँकरलॉबीचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे पालिका आमच्यासाठी आहे की टँकरलॉबीसाठी आहे? असा प्रश्न संतप्त रहिवासी उपस्थित करत आहेत. 

जोपर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत पालिकेने नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये अशी ठाम भूमिका आमदार संजय केळकर यांनी घेत लोक चळवळ उभी केली. अधिवेशनातही यावर आवाज उठवला. या पट्ट्यातील पाच भागांत केळकर यांनी दौरा करून पाणी समस्या जाणून घेतली. या दौऱ्यात निळकंठ ग्रीन, हिलक्रिस्ट, कॉसमॉस लौंज, पूजा गॅलेक्सी, लोढा स्प्लेनडर तसेच पाचपाखाडी आनंद सावली, धर्मवीर नगर आदी संकुलांमधील नागरिकांचा विशेषतः महिलांचा मोठ्या संख्येने समावेश होता.

सर्वसामान्य नागरिकांनी एकीकडे घर कर्जाचे हप्ते भरायचे, पालिकेची पाण्याची बिले भरायची आणि दुसरीकडे टँकरसाठी लाखो रुपये मोजायचे. हे किती दिवस चालणार, पालिका नागरिकांसाठी आहे की टँकर लॉबीसाठी? असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केला आहे.

या प्रकरणी येत्या शुक्रवारी महापालिकेत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेणार असून पाणी टंचाईवरील कृती आराखडा ठरवण्यात येणार असल्याची माहिती आमदार केळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

error: Content is protected !!