ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचा लाभ घेणाऱ्या घोडबंदर मार्गावरील प्रवाशांच्या मागणीनुसार आनंदनगर आगार येथे प्रवासी पास वितरण केंद्र येत्या १२ सप्टेंबर २०२२ पासून सुरू करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोईसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या या सेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा व परिवहन सभापती विलास जोशी यांनी केले आहे.
सद्यस्थितीत परिवहन सेवेचे शिवाजीनगर (बी केबीन) येथे पास वितरण केंद्र असून या ठिकाणाहून प्रवासी पास, विद्यार्थी पास, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, दिव्यांग ओळखपत्र, स्वातंत्र्यसैनिक ओळखपत्र इत्यादी सवलतीचे पास देण्यात येतात. परंतु सदर केंद्रावर जाण्यास घोडबंदर मार्गावरील प्रवाशांना लांब व गैरसोयीचे होत असल्याने घोडबंदर मार्गावर पास वितरण केंद्र सुरू करणेबाबत सातत्याने प्रवाशांकडून मागणी होत होती. या मागणीनुसार येत्या १२ सप्टेंबर २०२२ पासून आनंदनगर येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत पास वितरण केंद्र सुरू करण्यात येत आहे.तरी प्रवाशांनी या सोयीचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन सेवेच्यावतीने करण्यात आले आहे.






