दिवा: दिवा प्रभाग समितीअंतर्गत येणाऱ्या साबे गाव आणि लगतच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे, ज्यामुळे हैराण झालेल्या महिला आणि स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र संताप व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे विभाग प्रमुख नीलेश पाटील यांनी दिवा प्रभाग समितीचे पाणी पुरवठा अधिकारी वाघिरे यांना घटनास्थळी गाठून थेट जाब विचारला.
त्यावेळी झालेल्या संवादादरम्यान नीलेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले की, अनधिकृत जोडण्यांवर नक्की कारवाई करा, परंतु नागरिकांना त्यांच्या हक्काचे व कायदेशीर पाणी मिळालेच पाहिजे. मागील अनेक वर्षांपासून नागरिक पाण्यासाठी त्रस्त असून परिसरातील ८०% भाग विकतचे पाणी घेत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. साळवी नगरसाठी वेगळी ४ इंची पाइपलाइन टाकून तात्पुरती सोय करावी आणि त्यानंतरच जुन्या जोडण्यांवर किंवा अवैध जोडण्यांवर कारवाई करावी, असा पर्याय त्यांनी सुचवला. त्यावर अधिकारी वाघिरे यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेत नवीन लाइन टाकून लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, स्थानिक महिलांनी हातात पाण्याच्या बाटल्या आणि कागदपत्रे घेऊन पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला असून, या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.






