ठाणे: वीज बिल न भरता चोरून वीज वापरल्याप्रकरणी मुंब्रा-कौसा येथे राहत असलेल्या तन्वीर चौगुले या इसमास मुंब्रा पोलिसानी वीज चोरीप्रकरणी अटक केली आहे. त्याला आज न्यायालयासमोर हजर केले असता १ जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
कौसा येथील डोंगरे नगर परिसरात राहत असलेल्या तन्वीर चौगुले याने महावितरणच्या काळापासून वीज बिलाचा भऱणा केलेला नव्हता. ऑगस्ट २०२१ मध्ये त्यांच्या वीज बिल थकबाकीमुळे त्यांचा वीज मीटर टोरंट पॉवर कंपनीने काढला होता. मात्र त्यानंतरही त्यानी चोरून वीज वापरणे सुरू ठेवले. वीज बिल भरणा न केल्याने त्यांच्या घरचा वीज प्रवाह खंडीत झाला होता मात्र तरीही चोरून त्यानी अनेकदा वीज जोडणी करून घेतली. चौगुले याच्या दोन फ्लॅटमधील वीज बिल २.९६ लाख असून एकूण वीज चोरीचे मूल्यांकन केले असता ५.०१ लाखावर पोचले होते. वारंवार सूचना देऊनही वीज चोरी करणे त्याने थांबवले नव्हते. त्याच्यावर वीज कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात आली. वीज चोरी कायद्याने गुन्हा असून वीज चोरांविरोधात टोरंट कंपनीने कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.






