राऊत यांच्या शिक्षेवर भाजपाची प्रतिक्रिया
ठाणे: संजय राऊत यांच्या खोटेपणाचे पितळ उघडे पडल्यावर आता त्यांनी न्यायसंस्थेवरही ताशेरे मारण्यास सुरुवात केल्याने, त्यांचा तोल पुरता ढळल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या जनतेस मूर्ख समजून मनाला येईल त्या खोट्या कंड्या पिकविण्याचा राऊत यांच्या कारखान्याला न्यायालयाने टाळे लावले असून त्यांना झालेली शिक्षा म्हणजे संपूर्ण महाविकास आघाडीच्या खोटे पसरविण्याच्या उद्योगाला मिळालेली चोख चपराक आहे, अशी खरमरीत टीका भाजप चे आमदार ऍड निरंजन डावखरे यांनी शुक्रवारी ठाण्यात एका पत्रकार परिषदेत केली.
अनैतिक मार्गाने व जनादेश धुडकावून केवळ उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावर बसविण्यासाठी मविआच्या नावाने सत्तेवर डल्ला मारण्याचा डाव फसल्यामुळे संजय राऊत सैरभैर झाले असून महायुती सरकारच्या गतिमान विकास कामांमुळे सुरू असलेल्या प्रगतीची पोटदुखीही त्यांना जडली आहे. त्यामुळेच, सत्ता गेल्यानंतर संपूर्ण महाविकास आघाडीने फेक नॅरेटिव्ह फैलावून जनतेची दिशाभूल करण्याचा कट रचला. राज्यातून उद्योग परराज्यात गेल्याची अफवा, अटल सेतूला तडे गेल्याचा कांगावा, संविधान बदलण्याचा अपप्रचार, महाराष्ट्राचा मणिपूर होणार अशी भाकिते करून नागरिकांमध्ये भय निर्माण करण्याचा कट, अशी अनेक कारस्थाने महाविकास आघाडीने करून पाहिली, आणि सारी बिनबुडाची असल्याचे सिद्ध होऊन ती फसली. अशा खोट्याच्या फॅक्टरीतून पिकणारे अफवांचे पीक संजय राऊत यांच्या डोक्यात उगवत होते, आणि मविआचे अन्य नेते त्याला खतपाणी घालत होते, असा थेट आरोपही डावखरे यांनी केला.
याच सडक्या मानसिकतेतून राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न आता त्यांच्या अंगाशी आला आहे. खोट्याच्या पाठीत सोटा या न्यायाने त्यांना त्याची फळे भोगावी लागणार असून महाविकास आघाडीने आता तरी यापासून बोध घेत आपली कातडी वाचवावी व राऊत यांचा भोंगा बंद करावा, असा सल्लाही डावखरे यांनी दिला. खोटी माहिती जाणीवपूर्वक पसरवून राज्यात अस्थिरता निर्माण केल्यास आपल्या आघाडीचे नाकर्ते सरकार पुन्हा सत्तेवर येईल व निष्क्रीय उबाठा नेत्यांना सत्तेची मलई ओरपता येईल असा त्यांचा इरादा धुळीस मिळाला असून न्यायसंस्थेवर चिखलफेक करून त्यांनी जनतेचा उरलासुरला विश्वासही गमावला आहे, असे डावखरे म्हणाले.
यावेळी प्रवक्ते सागर भदे, सरचिटणीस मनोहर सुगदरे व युवा मोर्चा अध्यक्ष सुरज दळवी उपस्थित होते.






