Homeठाणे-मेट्रोट्राफिक रायडर्स ठरले देवदुत : ४६ विद्यार्थ्याचे वाचवले शैक्षणिक वर्ष ; ठाणे...

ट्राफिक रायडर्स ठरले देवदुत : ४६ विद्यार्थ्याचे वाचवले शैक्षणिक वर्ष ; ठाणे वाहतुक शाखेची मानवतावादी कामगिरी

ठाणे : दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यासाठी ठाणे शहर वाहतूक शाखेने राबवलेल्या विशेष ‘रायडर्स’ उपक्रमामुळे तब्बल ४६ विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष वाचले आहे. १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत शाळा – महाविद्यालय परिसरात वाहतुकीचे सुयोग्य नियमन करण्यासोबतच वाहतुक विभागाने ट्राफिक रायडर्सच्या माध्यमातुन विद्यार्थ्याना वेळेत परिक्षा केंद्रावर पोहचवण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. दरम्यान, ठाणे पोलिसांच्या या सेवाभावी उपक्रमाचे पालकवर्गाकडुनही कौतुक होत आहे.
दहावी व बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता यावे, यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम ठाणे पोलीस आयुक्तालयात राबवण्यात आला. वाहतूक कोंडी, वाहन बिघाड, लोकल उशीर अशा अडचणींमुळे उशीर होणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी शहरातील विविध भागांत ५४ रायडर्स सज्ज ठेवण्यात आले होते.
विद्यार्थ्यांसाठी 7039003866 हा ट्राफिक कंट्रोल व्हॉटसॲप क्रमांक तसेच, 8286300300 आणि 8286400400 हे हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले होते. याशिवाय १८ वाहतूक युनिट्समध्येही संपर्काची सोय करण्यात आली होती. या सुविधेला पालक आणि विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
१० फेब्रुवारी रोजी बारावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी नियंत्रण कक्षामध्ये २५ कॉल्स प्राप्त झाले, तर दुसऱ्या दिवशी एक कॉल आला. १७ फेब्रुवारी रोजी ठाणे, कळवा आणि नवी मुंबई एमआयडीसी परिसरात झालेल्या विविध अपघातांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत अडकलेल्या ४ विद्यार्थ्यांना ट्रॅफिक रायडर्सनी वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचवले. तसेच, ७ मार्च रोजी लोकल ट्रेन वेळेत उपलब्ध न झाल्याने अंबरनाथ येथील दोन विद्यार्थी रेल्वे स्थानकावर रखडले होते. याबाबत कॉल येताच वाहतुक उप आयुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस आयुक्त किरण बालवडकर यांनी ट्रॅफिक रायडर्सकरवी ‘ग्रीन कॉरिडॉर’ सारखी व्यवस्था करीत पर्यायी मार्गाने त्यांना कल्याण येथील परीक्षा केंद्रावर पोहोचवले. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्यापासून वाचले.
१० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत एकूण ४६ परिक्षार्थिना मदत करण्यात आली, ही बाब ठाणे वाहतूक विभागासाठी अभिमानास्पद ठरली आहे. वाहतुक पोलीस कर्मचारी, रायडर्स आणि अधिकाऱ्यांच्या या सेवाभावी कार्याचे उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी विशेष कौतुक केले आहे. दरम्यान, अशा प्रकारचे उपक्रम केवळ वाहतूक व्यवस्थापनापुरते मर्यादित न राहता, देशाचे भविष्य असलेल्या युवाशक्तीच्या भवितव्यासाठी पोलीसांच्या तत्पर आणि संवेदनशील सेवेचे प्रतिक ठरले आहे.

error: Content is protected !!