दिवा:दिवा शहरात घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणामध्ये मोठा घोटाळा सुरू असून, सर्वसामान्य नागरिकांची उघडपणे लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिवा शहर सचिव प्रशांत गावडे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून संबंधित गॅस एजन्सींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
काय आहे नेमका प्रकार?
दिवा शहरातील अनेक नागरिकांनी गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर त्यांना कंपनीकडून “सिलेंडर डिलिव्हर” झाल्याचा मेसेज येतो. मात्र, प्रत्यक्षात ८ ते १० दिवस उलटूनही सिलेंडर मिळत नाही. जेव्हा नागरिक गॅस एजन्सी किंवा डिलिव्हरी बॉयशी संपर्क साधतात, तेव्हा त्यांना पुन्हा नवीन सिलेंडर बुक करण्यास सांगितले जाते. हा प्रकार म्हणजे तांत्रिक फसवणूक असून, बुक केलेले सिलेंडर काळाबाजारात चढ्या दराने विकले जात असल्याचा दाट संशय मनसेने व्यक्त केला आहे.
भारत गॅस एजन्सींविरोधात तक्रारींचा ओघ
सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे गॅसचा तुटवडा असल्याचे भासवले जात आहे. याचाच फायदा घेत दिवा शहरातील काही एजन्सी, विशेषतः भारत गॅसच्या काही वितरकांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हक्काचा गॅस वेळेवर मिळत नसल्याने अनेक कुटुंबांचे स्वयंपाकघर ओस पडले असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे.
मनसेच्या प्रमुख मागण्या:
प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी यासाठी मनसे सचिव प्रशांत गावडे यांनी खालील मागण्या मांडल्या आहेत:
चौकशी व कारवाई: संबंधित गॅस एजन्सींची तातडीने चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी.
फौजदारी गुन्हे: नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.
परवाने रद्द करा: काळाबाजार करणाऱ्या एजन्सींचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात यावेत.
पारदर्शकता: गॅस वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणून नागरिकांना वेळेवर सिलेंडर उपलब्ध करून द्यावे.
“नागरिकांच्या हक्काच्या गॅसची चोरी करून तो काळाबाजारात विकणे हा गंभीर गुन्हा आहे. प्रशासनाने यावर तातडीने पावले न उचलल्यास मनसे स्टाईलने आंदोलन छेडले जाईल.”
— प्रशांत प्रभाकर गावडे (सचिव, मनसे दिवा शहर)






