सर्वोत्कृष्ट शाखा बनविण्याबरोबरच नाट्यसंमेलन ठाण्यात घेण्याचा म्हस्के यांचा निर्धार
ठाणे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखेच्या रविवारी झालेल्या विशेष बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांची संस्थेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. या बैठकीला नाट्यपरिषद मध्यवर्तीचे उपाध्यक्ष (प्रशासन) नरेश गडेकर, कोषाध्यक्ष सतीश लोटके आणि नियामक मंडळ सदस्य शिवाजी शिंदे हे निरीक्षक उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या याआधी असलेल्या परंपरेला पुढे नेत, अधिक जोमाने आणि नवीन दृष्टिकोनातून काम करत, ठाणे शाखेला सर्वोत्कृष्ट बनविण्याचा निर्धार यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला. ठाणे शाखेचे नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात एक वेगळं स्थान निर्माण करून देण्यासाठी कलाकार, निर्माते, रंगमंच व्यवस्थापक आणि कामगार या सर्व घटकांना एकत्र घेऊन काम करणार असल्याचे स्पष्ट करत त्यांनी आगामी काळात ठाण्यात आणखीन एक नाट्यसंमेलन आयोजित करण्याची मागणी मध्यवर्ती शाखेकडे केली.
ठाणे शाखेच्या नवीन कार्यकारणी मध्ये नरेंद्र बेडेकर (कार्याध्यक्ष), मोहन पवार(उपाध्यक्ष-प्रशासन), यतीन ठाकूर (उपाध्यक्ष-उपक्रम), दुर्गेश आकेरकर (प्रमुख कार्यवाह), महेश सावंत पटेल, निशिकांत महांकाळ (सहकार्यवाह), अंबरीश ओक (कोषाध्यक्ष), महेश शानबाग(सहकोषाध्यक्ष) यांच्यासह कार्यकारीणी सदस्य मकरंद जोशी, प्राची डिंगणकर, आदित्य संभूस, श्रृतिका मोरेकर, वृंदा दाभोळकर, वरदायिनी दिवेकर यांचा समावेश आहे. बालरंगभूमी परिषदेचे कार्याध्यक्ष ठाण्याचे रंगकर्मी राजू तुलालवार हे प्रमुख सल्लागार असतील, अशी माहिती संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.






