दिवा : कल्याण-शीळ रोड परिसरातील देसाई, पडले आणि खिडकाळी या गावांमधील पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच स्थानिक आमदार राजेश मोरे व शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक २९ मधील पाणीपुरवठा योजनेला गती देण्यात आली आहे. दिनांक २२ एप्रिल रोजी देसाई ते पडले दरम्यानची जुनी व खराब झालेली पाण्याची लाईन बदलून त्याठिकाणी ठाणे महानगरपालिकामार्फत ५०० mm व्यासाची नवीन पाइपलाईन टाकण्याच्या कामाचे उद्घाटन देसाई नाका येथील क्रोमा शोरूमसमोर उत्साहात पार पडले.
अनेक दिवसांपासून या परिसरातील ग्रामस्थ जुन्या जलवाहिनीमुळे अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा सामना करत होते. आता ५०० mm व्यासाची मोठी जलवाहिनी टाकण्याचे काम प्रत्यक्ष सुरू झाल्यामुळे देसाई, पडले आणि खिडकाळी या गावांचा पाणीप्रश्न सुटणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या उद्घाटन प्रसंगी स्थानिक नगरसेवक बाबाजी बाळाराम पाटील, नगरसेविका सौ. अर्चना निलेश पाटील आणि नगरसेविका सौ. वेदिका साहिल पाटील प्रामुख्याने उपस्थित होत्या.
यावेळी ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी वाघीरे , विभाग प्रमुख विष्णू कोटकर, उपविभाग प्रमुख दीपेश पाटील, मधुकर पाटील, बाळाराम पाटील, साहिल पाटील, विनायक पाटील, राकेश पाटील यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






