दिवा :मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेअंतर्गत दिवा शहरात २४, २५ आणि २६ जुलै २०२६ रोजी विशेष कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत. प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार मतदार यादीतील विविध भागांसाठी संबंधित BLO यांची नावे, मोबाईल क्रमांक आणि कॅम्पची ठिकाणे जाहीर करण्यात आली असून नागरिकांनी संबंधित BLO यांच्याशी संपर्क साधून EF फॉर्म भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. यावर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख ॲड.रोहिदास मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
SIR प्रक्रियेचा मूळ उद्देश घरोघरी जाऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करणे हा आहे. संबंधित मतदार त्या पत्त्यावर वास्तव्यास आहे का, स्थलांतरित झाला आहे का, मृत्यू झाला आहे का, तसेच मतदार यादीतील नोंदी अचूक आहेत का, याची खात्री घरोघरी जाऊन करणे अपेक्षित असते असे ॲड.रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.
दिवा शहरात मात्र मोठ्या प्रमाणावर कॅम्प आयोजित करून नागरिकांना तेथे येऊन फॉर्म भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे घरोघरी पडताळणी होत आहे की नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, घरोघरी पडताळणीऐवजी केवळ कॅम्पच्या माध्यमातून प्रक्रिया राबवली जात असेल, तर तो SIR च्या मूळ उद्देशालाच हरताळ ठरेल, असा आरोपच ॲड.रोहिदास मुंडे यांनी केला आहे.
अनेक ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, कामानिमित्त दिवसभर बाहेर असणारे नागरिक किंवा कॅम्पपर्यंत पोहोचू न शकणारे मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत घरोघरी प्रत्यक्ष पडताळणी न झाल्यास मतदार यादीचे सखोल पुनरीक्षण अपेक्षित दर्जाचे होईल का, असा सवाल मुंडे यांनी विचारला आहे.
याच पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित BLO यांनी घरोघरी भेटी दिल्या का? घरोघरी पडताळणीची नोंद ठेवण्यात आली आहे का? कॅम्पमध्ये फॉर्म स्वीकारल्यानंतरही घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे का? आणि जर घरोघरी पडताळणीच होत नसेल, तर या प्रक्रियेला “Special Intensive Revision (SIR)” म्हणण्यामागील औचित्य काय? हा प्रश्न ॲड.रोहिदास मुंडे यांनी विचारला आहे.
दिवा शहरात आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पच्या पार्श्वभूमीवर SIR प्रक्रियेतील “घरोघरी पडताळणी” हा मूलभूत घटक प्रत्यक्षात राबवला जात आहे की नाही, याबाबत निवडणूक प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडण्याची गरज ॲड.रोहिदास मुंडे यांनी व्यक्त केली आहे.






