ठेकेदाराचे बिल रोखण्याची आणि आयुक्तांकडे तक्रार करण्याची नगरसेविका अर्चना पाटील यांची भूमिका
दिवा:पावसाळा सुरू होताच पहिल्याच पावसात दिवा शहरातील काही सखल भागांत पाण्याचा निचरा न झाल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेविका सौ. अर्चना निलेश पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत दिवा शहराच्या मुख्य खाडी परिसराची आणि नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान मुख्य नालाच पूर्णपणे तुंबलेल्या स्थितीत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
सबंधित ठेकेदाराने योग्य प्रकारे नालेसफाई न केल्यामुळेच ही परिस्थिती ओढवल्याचे उघड झाले असून, नगरसेविका अर्चना पाटील यांनी तात्काळ खाजगी पोकलेन मशीन मागवून तुंबलेला नाला साफ करत पाण्याचा निचरा केला व नागरिकांना तात्पुरता दिलासा दिला.
नालेसफाईतील हा निष्काळजीपणा नगरसेविका सौ. अर्चना पाटील यांनी दिवा शहरप्रमुख व मा. उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या निदर्शनास आणून दिला व त्यांना सविस्तर माहिती दिली. संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांची महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार करण्यात येणार असून, कामचुकार ठेकेदाराचे बिल काढू नये, अशी आग्रही विनंती आयुक्तांना केली जाणार आहे. योग्य वेळी कारवाई झाली नाही, तर येत्या पावसाळ्यात दिवा शहराला दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा गंभीर पूरपरिस्थितीचा सामना करावा लागेल, अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली.
अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या प्रसंगी पाहणी दौऱ्यात नगरसेविका सौ. अर्चना पाटील यांच्यासोबत विभागप्रमुख निलेश पाटील, महापालिकेचे कनिष्ठ अभियंता वसावे , आणि कनिष्ठ अभियंता आदित्य डावखर उपस्थित होते.






