Homeठाणे-मेट्रोदिव्यात नालेसफाईच्या नावाखाली 'हातसफाई'? पहिल्याच पावसात रस्ते जलमय; चौकशीची जोरदार मागणी

दिव्यात नालेसफाईच्या नावाखाली ‘हातसफाई’? पहिल्याच पावसात रस्ते जलमय; चौकशीची जोरदार मागणी

दिवा:पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे मोठे दावे करणाऱ्या प्रशासनाचे पितळ पहिल्याच पावसात उघडे पडले आहे. दिव्यात नाल्यांची सफाई नीट न झाल्यामुळे पहिल्याच पावसाने अनेक भागांतील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून, जागोजागी पाणी साचले. यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. दिव्यात नालेसफाईच्या नावाखाली केवळ ‘हातसफाई’ झाली असल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी या संपूर्ण कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे.

दिव्यातील मुख्य रस्ता असलेला दिवा-आगासन रोड, मुंब्रा देवी कॉलनी रोड आणि सद्गुरुनगर या भागांतील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. पाणी साचल्यामुळे रस्ते पाण्याखाली गेले असून वाहनचालक आणि पादचाऱ्यांचे हाल झाले.

नागरिकांचा संताप; अंतर्गत गटारे तुडुंब

शहरातील मुख्य नाले साफ न केल्यामुळे आणि अंतर्गत गटारांची वेळेत सफाई न झाल्यामुळेच ही गंभीर समस्या उद्भवल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. पावसाळ्यापूर्वी कागदावर नालेसफाईची कोट्यवधी रुपयांची कामे दाखवली गेली, मात्र प्रत्यक्ष जमिनीवर कोणतेही काम झाले नसल्याचे आजच्या परिस्थितीवरून स्पष्ट होत आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

चौकशीची मागणी जोर धरू लागली

“नालेसफाईच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून केवळ पांढरे हत्ती पाळण्याचे काम प्रशासनाने केले आहे,” अशा प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत. केवळ अंतर्गत गटारे आणि नाले वेळेवर साफ न झाल्याने दिवावासीयांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या संपूर्ण नालेसफाईच्या कामाची तात्काळ आणि सखोल चौकशी व्हावी, तसेच दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी आता दिव्यातील नागरिकांकडून अत्यंत आक्रमकपणे केली जात आहे. आता यावर प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!