हातात करवत घेऊन पडलेल्या फांद्या कापल्या
खारीगावात पहाटे तीन वाजेपर्यंत जागून केले रस्ते मोकळे
ठाणे – गेले तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडत आहेत. पडलेली झाडे हटविण्यासाठी ठाणे महानगर पालिकेकडून प्रयत्न केले जात असले तरी त्यांना मनुष्यबळाच्या मर्यादा येत असल्याने खारीगाव येथील नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते अभिजीत पवार हे मध्यरात्री रस्त्यावर उतरले. हातात करवत घेऊन त्यांनी रस्त्यावर पडलेल्या झाडांच्या फांद्या कापून हटविल्या. पहाटे तीन वाजेपर्यंत त्यांचे हे काम सुरू होते.
सोमवारी रात्री मुसळधार पाऊस तसेच सोसाट्याचा वारा यामुळे विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. खारीगाव – पारसिक नगर येथील सोसायट्या तसेच रस्त्यावर रात्री 12 ते दीड वाजेच्या सुमारास सात झाडे कोसळली. या झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्या होत्या. ही माहिती मिळताच अभिजीत पवार यांनी ठाणे महानगर पालिकेच्या संबधित विभागाशी संपर्क साधला. मात्र, इतर भागातही पडलेली झाडे हटविण्याचे काम सुरू असल्याने ठामपा कर्मचारी येण्यास उशीर लागणार होता. त्यामुळे वेळ न दवडता इलेक्ट्रिक करवत तसेच कुर्हाड हाती घेऊन अभिजीत पवार यांनी झाडांच्या फांद्या कापण्यास सुरूवात केली. पहाटे तीन वाजेपर्यंत अभिजीत पवार आणि त्यांचे सहकारी हे काम करीत होते.
पहाटे तीन वाजता सोसायट्यांचे आवार आणि सर्व रस्ते मोकळे झाल्यानंतर पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उसंत घेतली. पवार यांच्या या कर्तव्यदक्षतेबद्दल परिसरात त्यांचे कौतूक होत आहे.






