Homeशहर परिसरदिवा शहराला जॉगिंग ट्रॅकची गरज; नव्याने होत असलेल्या दिवा शील रोड लगत...

दिवा शहराला जॉगिंग ट्रॅकची गरज; नव्याने होत असलेल्या दिवा शील रोड लगत जॉगिंग ट्रॅक उभारता येईल का? प्रशासनाने तपासून पाहायला हवे

सुहास खंडागळे

दिवा शहर गेल्या काही वर्षांत अत्यंत वेगाने विस्तारले आहे. लोकसंख्या झपाट्याने वाढत असून आज शहराची लोकसंख्या अंदाजे चार ते पाच लाखांच्या घरात पोहोचली आहे. वाढत्या नागरीकरणामुळे उंच इमारती, दाट वस्ती आणि वाहनांची वाढ यामुळे नागरिकांसाठी मोकळ्या जागा दिवसेंदिवस कमी होत आहेत. अशा परिस्थितीत आरोग्यदायी जीवनशैलीसाठी आवश्यक असलेला जॉगिंग ट्रॅक किंवा सुरक्षित पायी चालण्याची सुविधा दिवा शहरात जवळपास अस्तित्वातच नाही.
साबेगाव, दिवा स्टेशन परिसर, दिवा पूर्व, दिवा पश्चिम तसेच दातिवली-आगासन परिसरात दाट लोकवस्ती, अरुंद रस्ते आणि फुटपाथचा अभाव असल्याने नवीन जॉगिंग ट्रॅक उभारण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे या भागात अशी सुविधा निर्माण करणे सध्याच्या घडीला अत्यंत कठीण आहे.

मात्र दिवा-शील रोड हा भविष्यातील विकासाच्या दृष्टीने मोठी संधी ठरू शकतो. हा रस्ता विकसित होत असताना काही ठिकाणी तुलनेने अधिक जागा उपलब्ध आहे. विशेषतः जुन्या डम्पिंग ग्राउंड परिसरलगत रस्त्याच्या एका किंवा दोन्ही बाजूंनी नियोजनबद्ध पद्धतीने जॉगिंग ट्रॅक, पदपथ, वृक्षलागवड आणि बसण्याची व्यवस्था उभारण्याचा विचार महापालिकेने केला तर हजारो नागरिकांना त्याचा थेट लाभ मिळू शकतो.
यासाठी विद्यमान रस्त्याच्या आराखड्यात आवश्यक ते बदल करण्याची तयारी, महापालिका प्रशासनाची दूरदृष्टी आणि लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती आवश्यक आहे. आज घेतलेला नियोजनबद्ध निर्णय पुढील अनेक दशकांसाठी दिवा शहराला आरोग्यदायी सार्वजनिक सुविधा देऊ शकतो.
जॉगिंग ट्रॅक ही केवळ फिरण्यासाठीची जागा नसून ती नागरिकांच्या आरोग्याची, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षित फेरफटक्याची आणि मुलांमध्ये व्यायामाची सवय निर्माण करणारी महत्त्वाची नागरी सुविधा आहे. आधुनिक शहरांमध्ये अशा सुविधा विकासाचा अविभाज्य भाग मानल्या जातात.
दिवा शहराची ओळख केवळ अनधिकृत बांधकामांचे शहर अशी राहू नये. उलट येथे राहणाऱ्या लाखो नागरिकांना दर्जेदार आणि नियोजनबद्ध नागरी सुविधा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. विकास म्हणजे केवळ रस्ते आणि इमारती नव्हेत, तर नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करणाऱ्या सार्वजनिक सुविधांची निर्मितीही तितकीच महत्त्वाची आहे.
आजही वेळ गेलेली नाही. दिवा-शील रोडच्या विकासासोबत जॉगिंग ट्रॅकचा प्रस्ताव प्रत्यक्षात आणल्यास भविष्यात दिवा शहराला एक महत्त्वाची आरोग्यदायी भेट मिळू शकते. आता महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या संधीचे सोने करणार का, याकडे दिवेकरांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!