दिवा : विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेच्या अंमलबजावणीबाबत दिव्यात मनसेने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मनसेचे दिवा शहराध्यक्ष प्रशांत गावडे यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओद्वारे, SIR प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला आहे.
प्रशांत गावडे यांच्या म्हणण्यानुसार, ३० जुलैपर्यंत SIR प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असतानाही अनेक भागांत बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांच्याकडून घरोघरी जाऊन पडताळणी करण्याच्या कामाला अद्याप अपेक्षित गती मिळालेली नाही. तसेच, केवळ एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनाच भेटून SIR अर्जांचे वितरण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
याउलट, इतर पक्षांच्या बूथ लेव्हल एजंट्स (BLA) यांनी गेल्या आठ ते दहा दिवसांपासून BLO यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याचा दावाही गावडे यांनी केला आहे. त्यामुळे SIR प्रक्रियेत सर्व मतदारांना समान संधी दिली जात आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
या पार्श्वभूमीवर, निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकाऱ्यांनी या आरोपांची दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि SIR प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व निष्पक्षपणे राबवावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.






